फुटबॉल विश्वचषकाच्या स्टेडियममध्येही बीअरबंदी!

कतारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हजारो मद्यप्रेमी नाराज

रविवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये बिअर विक्रीस संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा सुरू होण्यास ४८ तास बाकी असताना अचानक निर्णय बदलल्यामुळे हजारो मद्यप्रेमी प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘विश्वचषक स्पर्धेच्या यजमान देशाचे प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्टेडिअममध्ये बिअरची विक्री करण्यास संपूर्ण बंदी करण्यात आली आहे,’ असे फिफाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. स्टेडिअममधील महागडय़ा ‘लक्झरी’ भागामध्ये शँपेन, वाईन, व्हिस्कीसह अन्य अल्कोहोलयुक्त पेये दिली जाणार असली तरी सर्व आठ मैदानांवरील सर्वसामान्य तिकिटधारकांना केवळ अल्कोहोलविरहीत शीतपेयांवर समाधान मानावे लागणार आहे.

‘बडवायझर’ बिअर तयार करणारी कंपनी, ‘एबी इनबेव’ने १९८६ साली ‘फिफा’ सोबत करार केला आहे. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये मद्यविक्रीचे अधिकृत हक्क कंपनीकडे आहेत. त्याच्या मोबदल्यात कंपनी ‘फिफा’ला अब्जावधी डॉलर देते. कतारने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी जेव्हा आपली निविदा सादर केली तेव्हा आणि करार केला तेव्हाही ‘फिफा’चे सर्व व्यावसायिक करार स्वीकारले होते. त्यानंतर दिसणार नाही अशा ठिकाणी बडवायझरला स्टॉल लावण्याची परवानगीही देण्यात आली होती. त्यासाठी कंपनीने बडवायझरचा मोठा साठा लंडन येथून कतारमध्ये पाठवला आहे. मात्र, आता कतारने अचानक आपली भूमिका बदलल्यामुळे मद्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. ‘मद्यपान न करणाऱ्यांना फरक पडणार नाही. पण ऐनवेळी असा निर्णय घेणे धोक्याचा इशारा आहे. दिलेल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही,’ असा सवाल फुटबॉल सपोर्टर्स युरोप या गटाचे महासंचालक रोनान एविन यांनी केला. ‘एबी इनवेब’ आणि कतार प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे ‘असोसिएटेड प्रेस’ने म्हटले आहे.

‘कतार में है’चा प्रत्यय

 २०१४ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत यजमान ब्राझीलला आपल्या नियमात बदल करून स्टेडियममध्ये बिअर विक्रीस परवानगी द्यावी लागली होती. कतारने मात्र ‘फिफा’ला व्यावसायिक करार मोडण्यास भाग पाडले आहे. या देशात एका कुटुंबाची हुकुमशाही सत्ता असून ‘आमीर’चा शब्द अंतिम असतो. शेजारील सौदी अरेबियाप्रमाणेच कतारमध्ये पुराणमतवादी वहाबी पंथाचा पगडा असला तरी हॉटेल, बारमध्ये मद्यविक्रीस अनेक वर्षांपासून परवानगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.