अवघ्या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नवउद्योगाने संपूर्ण विकसित केलेल्या ‘विक्रम-एस’ उपग्रह प्रक्षेपकाद्वारे तीन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशातील नियोजित कक्षेत शुक्रवारी भारतातर्फे सोडण्यात आले. याद्वारे भारताच्या अवकाश मोहिमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाची नांदी झाली आहे. आतापर्यंत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) या दिग्गज सरकारी संस्थेची यात मक्तेदारी होती.
चेन्नईपासून सुमारे ११५ किलोमीटरवरील ‘इस्रो’च्या सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी साडेअकराला हे प्रक्षेपण झाले. ‘स्कायरूट एरोस्पेस’ या खासगी नवउद्योगाने (स्टार्ट अप) निर्मित केलेल्या या उपग्रह प्रक्षेपकाला ‘विक्रम-एस’ असे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देऊन त्यांच्या या क्षेत्रातील योगदानास औचित्यपूर्ण अभिवादन करण्यात आले आहे. २०२० मध्ये केंद्राने अवकाश क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केल्यानंतर ही प्रक्षेपकाची यशस्वी निर्मिती व प्रक्षेपण करणारी ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.
‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’ या अवकाशविषयक नियामक संस्थचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी येथील ‘इस्रो’च्या मोहीम नियंत्रण केंद्रातून बोलताना सांगितले, की ‘स्कायरूट एरोस्पेस’द्वारे ‘मिशन प्रारंभ’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. या प्रक्षेपकाने ‘स्कायरूट’ने नियोजित केलेली ८९.५ किलोमीटरची उंची आणि १२१.२ किलोमीटरची कक्षाश्रेणी नेमकी गाठली आहे. नियोजनानुसार हे प्रक्षेपक कार्यान्वित झाले. त्यामुळे ‘स्कायरूट एरोस्पेस’ने उपग्रह प्रक्षेपकातील उपप्रणीली निर्मितीची आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय खासगी क्षेत्रासाठी अवकाश क्षेत्रातील ही एक नवी सुरुवात आहे. आपल्या सर्वासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
या मोहिमेत तीन व्यावसायिक उपग्रह आहेत. यापैकी दोन देशांतर्गत ग्राहकांचे असून, एक परदेशी ग्राहकाचा आहे. ६ मीटर उंच उपग्रह प्रक्षेपक वाहन जगातील पहिल्या काही सर्व-संमिश्र प्रक्षेपकांपैकी एक आहे. त्यात प्रक्षेपकाच्या स्थैर्यासाठी ‘३-डी पिंट्रेड सॉलिड थ्रस्टर’ आहेत.