राज्यात ५३ आदर्श आयटीआयसह एकात्मिक कौशल्य भवनाची निर्मिती; ‘जागतिक बँकेचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य मिळवणार’

जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यमध्ये किमान एक आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मॉडेल आयटीआय) आणि  मुलींसाठी १७ आयटीआय निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सुविधांनी युक्त असे जागतिक कौशल्य केंद्रही उभारण्यात येणार आहे.

राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्यात येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन आदी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला चांगले कौशल्य प्रशिक्षण मिळवून देण्याबरोबरच त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यात येईल. यासाठी विभागाला वित्त विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तर कारखाने आणि उद्योगांमधील बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानानुसारच आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील आयटीआयचे अद्ययावतीकरण करण्याकरिता विभागाने पुढाकार घेतला आहे. येत्या काळात कौशल्य विकास विभागाचा कायापालट करण्याचा मानस आहे. यासाठी विविध उपक्रम आणि प्रकल्प प्रस्तावित असल्याचे लोढा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.