ऐन हिवाळ्यात पाऊस मुंबईच्या वेशीवर! राज्यातील या जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाचा तडाखा

राज्यात गेल्या दोनचार दिवसांपासून जे वातावरण आहे. त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. कारण, गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय. तसाच काहीसा पाऊस आज बदलापूर शहरात देखील सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना भिजत तर काहींना छत्रीचा आधार घेत आपले इच्छित स्थळ गाठावा लागले. दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी पडलेला हा पाऊस या वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात काल हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर असलेल्या बदलापूर शहरात पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्याच्या मोसमात बदलापूर शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे लवकरच मुंबईकरांनाही पाऊस गाठण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं शेतकरी धास्तावले असून वीटभट्टी व्यावसायिक देखील चिंतेत आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तर रात्रीच्या दरम्यान काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलाय. तरकारी, पिके, फळे आणि फुले यावर वातावरण बदलाचा परिणाम झाला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत आलाय. अचानक वातावरणातील बदल आणि पावसामुळे द्राक्षे, पेरु फळबागाधारक शेतकरी धास्तावला आहे. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात आज सायंकाळी खामगाव, नांदुरा ,मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला आहे. तर अनेक भागात पावसाने कांदा, हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.