पुढील आदेशापर्यंत ‘शिवलिंग’ सापडलेल्या परिसराचे संरक्षण कायम, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या आतील भागाच्या संरक्षणाचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. याच भागात सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडले होते. या भागाला पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सुर्या कांत आणि न्या. पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी वादावर दाखल सर्व खटल्यांच्या एकत्रिकरणासंदर्भात वाराणसी न्यायालयात अर्ज करण्यास परवानगी दिली आहे. सर्वेक्षण आयुक्तांच्या नियुक्तीबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन इंतेझामिया मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आव्हान दिले आहे. यावरही हिंदू पक्षाला तीन आठवड्यांमध्ये प्रतिसाद देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक
ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच ‘एबीपी माझा’शी बोलताना ही माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन सह सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे.राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामधील नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत महत्त्वाच्या राज्यांमध्ये १२ भारतीयवंशाच्या उमेदवारांचा डंका
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका तेथील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. याच निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत. विजय उमेदवारांमध्ये एकूण १२ भारतीयवंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत विजय झालेल्या भारतीयवंशाच्या उमेदवारांमध्ये कुमार बर्वे, सॅम सिंह, मनका धिंग्रा, डॉ. अनिता सोमाणी, जेरेमी कुने, जोहरान ममदानी, जेनिफर राजकुमार, रणजीव पुरी, डॉ. वंदना श्रीनिवास, नबीला सईद, डॉ. अरविंद व्यंकट यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी दक्षिण भारतातील पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचदरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील मैसूर आणि चेन्नई दरम्यानच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.
रवींद्र जाडेजाच्या पत्नीविरोधात बहिण उतरणार मैदानात? भाजपला कोंडीत पकडण्याची काँग्रेसची रणनीती
भारतीय जनता पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याची पत्नी रिवाबा जाडेजा यांचे देखील नाव आहे. रिवाबा यांना जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. भाजपाने रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट दिल्यानंतर आता काँग्रेस त्याची बहिण नयना जाडेजा यांना तिकीट देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘बिलियन डॉलर लीग क्रिकेटर खेळणारा संघ मागे राहिला…’ रमीज राजाने टीम इंडियाची उडवली खिल्ली
टीम इंडियाचा गुरुवारी (१० नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास आज इथेच संपला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर १३० कोटी भारतीय जनतेची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेचं नाराज असल्याचे पाहायला मिळाले. याला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील अपवाद नव्हता. यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी भारतीय संघाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी टीम इंडियाची खिल्ली उडवली आणि म्हटले की, “पाकिस्तानचे खेळाडू बिलियन डॉलर लीगच्या क्रिकेटपटूंपेक्षा चांगले आहेत. ऑस्ट्रेलियात आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे व्यक्त केले.
SD Social Media
9850 60 3590