नुकत्याच जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडून पाषाणहृदयी आई निघून गेली. छत्तीसगडमधील मुंगेली शहरातून ही काळजाला घरं पाडणारी बातमी समोर आली आहे. नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी बाळाला वाचवलं, अन्यथा कुत्र्यांनी त्याचा फडशा पाडण्याची भीती होती. कदाचित रात्रभर हे अर्भक कुत्र्यांच्या पिल्लांसोबत होतं, मात्र त्याला साधं खरचटलंही नाही. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमने बालकाला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
छत्तीसगडमधील मुंगेली शहरातील लोरमी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सारीसताल गावात ही हृदय हेलावणारी घटना घडली. कोणीतरी एका दिवसाच्या नवजात बालकाला गावाच्या मधोमध असलेल्या चौकात सोडून गेलं होतं. गावकऱ्यांनी याची माहिती लोरमी पोलिसांना दिली. एएसआय चिंताराम बिंझवार पोलिसांच्या साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारांनंतर बाळाला मुंगेलीतील चाईल्ड केअरला रेफर करण्यात आलं. सध्या बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.
लोरमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी सूचना दिल्यावर सारीसताल गावात एका नवजात अर्भक सापडलं. ती केवळ एका दिवसाची मुलगी आहे. डॉक्टरांनी तिला मुंगेलीतील चाईल्ड केअर सेंटरमध्ये दाखल केलं आहे, या प्रकरणी कुठलीही केस दाखल करण्यात आलेली नाही. तपास सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.
हे बाळ कोणाचं आहे, याचा लवकरच शोध घेतला जाईल. बालिका पूर्णपणे सुरक्षित आहे. तिची पूर्ण काळजी घेतली जात आहे. कदाचित रात्रभर ती कुत्र्यांच्या पिल्लांसोबत होती, मात्र तिला जराशीही दुखापत झालेली नाही. बाळाला नेमकं कोणी सोडलं, तिच्या आईनेच त्याला टाकलं, की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.