नागपूर जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्के पूर्ण झालीय. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना पाठविलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास नागपूर जिल्ह्यातील वेळेची बंधने हटणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात. त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.
नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून लसीकरणाची टक्केवारी पहिला डोस घेणारे 99 टक्के आणि दुसरा डोस घेणारे 70 टक्के झालेय. त्यासोबतंच कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7 टक्क्यांपेक्षा खाली आलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी आर विमला यांनी निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. येत्या सोमवारपासून नागपुरातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.
शहरातून 1 हजार 526, ग्रामीणमधून 771 व जिल्ह्याबाहेरील 21 असे 2318 जण ठणठणीत बरे झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 5 लाख 54 हजार 806 वर गेली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्क्यांवर आले आहे. बाधितांची संख्या घटत आहे. कोरोनामुळे दगावणार्यांच्या संख्येत चढ-उतार कायमच आहे. गुरुवारी शहरातील तीन व जिल्ह्याबाहेरील दोन अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 310 वर गेली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात 8293 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 6.63 टक्के म्हणजेच 549 जणांचे अहवाल सकारात्मक आढळले.
शहरात 5 हजार 96, ग्रामीणमध्ये 4 हजार 89 व जिल्ह्याबाहेरील 415 असे 9 हजार 600 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 89.67 टक्के म्हणजेच 8 हजार 608 जणांना लक्षणेच नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने बाधितांची संख्या जिल्ह्यात वाढली. गुरुवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून 82 जणांचे अहवाल ओमिक्रॉन सकारात्मक आढळले. यातील बहुतांशी रुग्ण ठणठणीत बरे झालेत.