राजभवनाच्या दरबार हॉलच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राजभवनात थुई थुई नाचणारे मोर येतात. तसेच विषारी नागही येतात. अनेकदा आपण त्यांचे फोटो पाहत असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोले लगावले. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले राजभवन हे देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. बाजूलाच गर्द हिरवी झाडे आहेत. अशी वास्तू अन्यत्र शोधूनही सापडणार नाही. या राजभवनात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांना तसेच अनेक राज्यपालांना भेटलो होतो. आता राजभवनातील हा नवा दरबार हॉल सशक्त लोकशाहीतील घडामोडी पाहण्यासाठी सुसज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती सविता कोविन्द, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेही लगावले. आपलं राजभवन कदाचित हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल.
या वास्तुला 50 एकरची जागा लाभली आहे. एका बाजूला अथांग समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला गर्द हिरवीगार झाडी आहेत. या परिसरातील हवा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या. पण मलबारहिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राजभवनाच्या जुन्या दरबार हॉलचा वारसा जपून त्याचे नूतनीकरण केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. राजभवनाने पारतंत्र्यातील काळ पाहिला तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते दरबार हॉलच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रवेशद्वार पूजन करण्यात आले. यावेळी दरबार हॉलचा इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. नितीन आरेकर यांनी केले तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी आभार प्रदर्शन केले.