भुसावळ खाद्यभ्रमंती : 9
भरीत आणि भुसावळ म्हणजे हे एक अजोड नातं.. राम लखनच म्हणाना…साधारणपणे शहरांमधे अनेक ठिकाणी पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी,पावभाजी, व इतर अनेक स्ट्रिट फुड्सचे जसे स्टाँल्स असतात तशी तुम्हाला भुसावळमधे जागोजागी भरीत सेंटर्स दिसतील.. प्रत्येकाची आपआपली चव.. पण जवळपास सर्वच चांगली. जवळपासच्या खेड्यांमधुन यासाठी लागणारी वांगी येत असतात..त्यातल्यात्यात भुसावळजवळच्या ” बामणोद ” मधली वांगी यासाठी प्रसिध्द. रविवारी तिथे भरणा-या आठवडे बाजारात हि वांगी आपल्याला बघायला मिळतात.. वेताची विणलेली मोठी , उंच टोपली त्यावर हिरवीगार केळीची पानं , त्यावर एकावर एक उभी अशी मांडलेली वांगी..हिरव्या-पांढरा रंग खाली देठाचा मातकट हिरवा रंग, एक एक वांग हे अर्ध्या किलोच्यावर! अशी वांगी निवडुन घेण हे माहीतगाराच काम, यातला कडकपणा मऊुपणा, बिया जास्त कि कमी हे त्यालाच कळत.. विकणा-याची टकळी एकिकडे चालु असते ” येकदम कापुस हे साह्येब, आढी काटुन दावतो तुमाले ,बिया निघाल्या तर येक रु. घेनार नी मी फुकट दि टाकीन तुमाले” ..आपण मात्र नीट खात्री करुनच घ्यायच. या रविवारच्या बाजारात फिरणे म्हणजे डोळ्यांना पर्वणीच..सगळीकडे रंगाची नुसती उधळण..हिरव्यागार मिरच्यांच्या तर राशी असतात..त्यामध्ये अनंत प्रकार..हिरवी ,पिवळी,लालभडक, गडद हिरवी म्हणजे जवळपास काळसर जांभळी अश्या अनेक मिरच्या.. जांभळी किंवा पांढरी काटेरी वांगी,पोपटी पोकळा,आंबटचुका, गवार, पिवळीजर्द लिंब, गडद हिरवा सुवासाने घमघमलेला पुदिना, मेथीच्या जुड्या, हिरवागार पातीचा कांदा ( हा भरीता साठी मस्ट) लुललुशीत गोड मुळा, शेताच्या बांधावर येणारी चिवळाची भाजी, हारीने मांडलेले सुरणाचे गड्डे, ( याच कोरड पिठल करतात व त्यावर कच्च तेल घालुन ते ज्वारीच्या भाकरीसोबत खायच तोंडी लावायला बिबडी..सुटसुटित पण तितकच रुचकर जेवण ) किती आणि काय घ्यावे असा प्रश्न पडावा. अश्या वांग्यांच्या भरताचे भरीत खाणे म्हणजे धमालच.. भरीत सेंटर वर याच्या बरोबरीने कळण्याची भाकरी किंवा पु-या देतात. कळण्याच पीठ हेसुध्दा भुसावळने स्वत:चं अस जपलेल “वेगळेपण” आहे. ज्वारी,अख्खे काळे मुग व त्यातच मिसळलेले खडे मीठ ,अस हे मिश्र धान्य दळुन आणुन त्याच्या भाक-या किंवा पु-या करायच्या. तसच वांगी बाजारातुन आणली किती चांगली खरपुस भाजायची ( शक्य असेल तर चुलीवर ) नंतर काळी झालेली साल हलक्या हाताने काढायची, व ती लाकडाच्या बडगीत , लाकडाच्या बत्याने चांगली ठेचून घ्यायची , कढईत भरपुर असे शेंगदाण्याच तेल घ्यायच , त्यात दाणे,हिरव्या मिरचीचा ठेचा ( अस्सल भुसावळकर : ठेसा ) ओवा ,उभ्या चिरलेल्या अख्ख्या मिरच्या, कांद्याची हिरवी पात व ठेचलेल वांग घालुन छान परतुन घ्यायच..कि भरीत तयार ,याच्याबरोबर कढि आणि पु-या किंवा कुरकुरीत भाकरी आणि झणझणीत ह्या शब्दाला लाज वाटावी असा हिरव्या मिरचीचा ठेचा , तोंडी लावायला कांद्याची पात, तिखट असा चिरलेला गावरान लाल, पांढरा कांदा व रशरशीत लिंबु..हे लिंबु भरीतावर पिळायच व पुरी किंवा भाकरी बरोबर पहिला घास घ्यायचा ..आपल्या मुखात जो काही तिखट ,आंबट अश्या झणझणीत चवीचा असा काही स्फोट होतो ,कि काय सांगाव ..घासागणिक पाण्याचा घोट घ्यावा लागतो पण हात मात्र थांबत नाही..हा साग्रसंगीत बेत हा शक्यतो रविवारीच..कारण त्यानंतर हमखास येणा-या झोपेला कोणीही अडवु शकत नाही. या भरीतापुढे ” बैंगन का भर्ता ” वगैरे ह्या अंध्दश्रध्दा वाटायला लागतात. हिवाळ्याच्या भरीत पार्ट्या, हि तिथली एक अनोखी मेजवानी. बहुतांश शेतकरी वर्ग..एकेक जण किमान 50-60 एकर बाळगुन..शेतात तूर ,कापुस,केळी, वांगी ,ज्वारी हि पीक प्रामुख्याने..पण आपल्या शेतात पार्टी करायची म्हटल्यावर जणु स्पर्धाच ..तु आधी देतो कि मी आधी..अशी निकोप स्पर्धा ! तिथे रंगणा-या भरीत,दाळ बाफले,दाळगंडोरीच्या पार्ट्यांबद्दल पुढिल भागात भेटुयात… तोपर्यंत घरचचं खा आणि स्वस्थ रहा…एक विनंती : माझे लिखाण शेअर करण्यास माझी काहीही हरकत नाही. फक्त नावासहित करा म्हणजे झाल, है सांगायच कारण म्हणजे माझेच लेख मला व्हाँट्सअपवर आलेत ( पण नाव erase करुन )..असो ..तस का होईना ,आपल्या गावंच खाण हे सर्वदूर पोहोचतय यातच सर्व आल !
© सारंग जाधव