महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड
राजकारणातील ‘चाणक्य’ अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणासोबतच क्रिकेट विश्वातही तितकेच अॕक्टिव्ह दिसतात. आता आजोबांपाठोपाठ त्यांचा नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांची देखील क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या कमिटीची बैठक पारपडली. यात रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
“मराठी माणसात व्यवसाय करण्याचं धाडस नाही”, चंद्रकांत पाटलांचं पुण्यात विधान
मराठी माणूस हा शिक्षण झाल्यास नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं तो धाडस करत नाही. मराठीचा टक्का व्यवसाय आणि राजकारणात कमी झाला आहे. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. पी.डी.पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे आदी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन
कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
कोविडबाबत चीनची अरेरावी सुरूच; करोना धोरणावर टीका करणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स केले बंद!
गेल्या काही काळात भारतासह जगभरात करोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला आहे. मात्र, चीनमध्ये अद्याप करोना विषाणूचं थैमान सुरू आहे. येथे दररोज हजारो करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना चीनमधील नागरिकांमध्ये सरकार आणि करोना धोरण राबवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चिनी सरकारच्या करोना धोरणावर टीका करत आहेत.
सुपरस्टार थलपथी विजय आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची बातमी खोटी
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सध्या चांगलाच चर्चेत आहे. थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोघांचा २३ वर्षांच्या सुखी संसारात अचानक वादळ आल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.सुपरस्टार विजयच्या एका निकटवर्तीयाने ही गोष्ट खोडून काढली. या दोघांचा घटस्फोट होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विजय आणि संगीताच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने या गोष्टीची पुष्टी केली आहे. २२ वर्षांपासून या दोघांचा सुखी संसार सुरू आहे आणि या सगळ्या बातम्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं त्या व्यक्तीने स्पष्ट केलं आहे.
सूर्यकुमार यादवचा नवा विश्वविक्रम
भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ९१ धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय ३ शतके झळकावता आलेली नाहीत.
SD Social Media
9850 60 3590