भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
उद्या म्हणजेत 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय जेडीयू, अपना दलचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. त्यामुळे अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. नुकतीच पटेल यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.
दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.