सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या, विधान परिषद सदस्या के. कविता यांना ९ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणातील अनियमिततेसंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे. या तपासास पूर्ण सहकार्य करू, असे कविता यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की ४४ वर्षीय कविता यांना हैदराबाद येथील मद्य व्यावसायिक रामचंद्र पिल्लई यांच्या उपस्थितीत चौकशीसाठी बोलावले आहे. कविता यांची पिल्लई यांच्यासह समोरसमोर बसवून चौकशी करण्यात येईल व आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येईल. पिल्लई हे ‘ईडी’च्या ताब्यात आहेत व ‘ईडी’ने केलेल्या दाव्यानुसार पिल्लई यांनी सांगितले आहे, की के. कविता व इतरांशी संबंधित कथित मद्यविक्री समूह ‘साऊथ ग्रुप’शी ते संबंधित आहेत. पिल्लईची ईडीची कोठडी १२ मार्चपर्यंत आहे. त्याला १३ मार्च रोजी पुन्हा दिल्ली न्यायालयात हजर केले जाईल. जर कविता गुरुवारी (९ मार्च) चौकशीसाठी हजर झाल्यान नाहीत तर ‘ईडी’ पिल्लईच्या कोठडीदरम्यान नवीन तारीख देऊन त्या दिवशी त्यांची चौकशी करू शकते. ‘ईड़ी’ने केलेल्या दाव्यानुसार ‘साऊथ ग्रुप’मध्ये कविता यांच्यासह ‘अरोबिंदो फार्मा’चे प्रवर्तक सरथ रेड्डी, वायएसआर काँग्रेसचे खासदार आणि ओंगोलचे खासदार मागुंथा श्रीनिवासलू रेड्डी आदींचा समावेश आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) के कविता यांची या प्रकरणी यापूर्वीही चौकशी करून जबाब नोंदवून घेतला होता.
दिल्ली सरकारने २०२१-२२ साठी मद्य व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी आणलेल्या अबकारी धोरणाने गटबाजीला चालना दिली व काही मद्य व्यावसायिकांनी त्यासाठी लाच दिल्याने त्यांना अनुकूल भूमिका घेतल्याचा आरोप आहे. मात्र, दिल्लीच्या सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) हे आरोप फेटाळले आहेत.
सहकार्य करू पण झुकणार नाही : कविता
सत्ताधाऱ्यांचे हे धमकावण्याचे डावपेच आहेत. भारत राष्ट्र समिती त्यासमोर झुकणार नसल्याचे के. कविता यांनी स्पष्ट केले. कायद्याचे पालन करणारी नागरिक असल्याने मी तपास संस्थेला पूर्ण सहकार्य करेन. तथापि, राजधानी दिल्लीत धरणे आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीसाठी उपस्थित राहायचे की नाही यावर कायदेशीर सल्ला घेईन. १० मार्च रोजी महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ त्या जंतरमंतर येथे धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने ९ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे कविता यांना सांगितले होते.