आम आदमी पक्षाने बुधवारी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या तिहार कारागृहातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. सिसोदिया यांना कारागृहात धोकादायक अट्टल गुन्हेगारांसह कोठडीत ठेवल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला, की सिसोदिया यांना कारागृहात इतर गुन्हेगारांसोबत ठेवले जात आहे व त्यांना विपश्यना ध्यानासाठीचा विशेष कक्ष नाकारला आहे. ‘आप’चे आरोप निराधार असून, ते फेटाळत कारागृह प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले, की सिसोदिया यांना ‘तिहार’च्या मध्यवर्ती कारागृह क्रमांक एकमधील एका कक्षात ठेवले आहे. जेथे कमीत कमी कैदी आहेत व त्यापैकी कुणीही गुंड नाही.
भारद्वाज यांनी दावा केला की, न्यायालयाने मंजुरी देऊनही, सिसोदिया यांना विपश्यना कक्ष प्रदान केला नाही. सिसोदिया यांना कारागृहातील विपश्यना कक्षात ठेवण्याची विनंती न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यानंतरही सिसोदियांना कारागृह क्रमांक एकमध्ये इतर गुन्हेगारांसोबत ठेवले आहे. ते असे का करत आहेत याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे. ‘आप’चे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी भाजप व केंद्रावर टीका करताना आरोप केला, की ते ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. भाजप व केंद्र सरकारला द्वेषाने पछाडले आहेत. ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. दररोज विरोधी नेत्यांवर ‘सीबीआय’ किंवा ‘ईडी’चे छापे पडल्याच्या बातम्या येत आहेत. सत्ताधारी भाजपला सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी व एकूणच देशाच्या सर्वागीण प्रगतीची फारशी चिंता नाही. सिसोदियांना धोकादायक गुन्हेगारांसह कारागृहात ठेवले आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत पक्षाच्या नेत्यांना चिंता वाटत आहे.
‘आप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पांडे म्हणाले, की न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करत सिसोदियांना गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांसोबत ठेवले जात आहे. आधी त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मानसिक छळ करण्यात आला. आता भयंकर गुन्हेगारांसोबत ठेवले जात आहे. खोटय़ा आरोपांच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.
कारागृह प्रशासनाने आरोप फेटाळले
हे आरोप फेटाळताना एका निवेदनात कारागृह प्रशासनाने म्हटले आहे, की सिसोदिया यांना त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन एका वेगळय़ा कक्षात ठेवले आहे. तेथे कमीत कमी कैदी असून, ते धोकादायक गुंड नसून, त्यांचे कारागृहातील वर्तन चांगले आहे. कारागृह अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका स्वतंत्र कक्षामुळे सिसोदियांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता ध्यान करणे किंवा अशा इतर क्रिया करणे शक्य आहे. सिसोदियांच्या सुरक्षिततेसाठी कारागृहाच्या नियमांनुसार सर्व व्यवस्था केल्या आहेत. त्यांच्या निवासस्थानाबाबत कोणतेही आक्षेप-आरोप निराधार आहेत.