परभणी येथील राज्यसभेच्या सदस्या डॉ. फौजिया खान यांची नुकतीच संसद रत्न म्हणून निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांचा समावेश असलेल्या समितीने नुकतीच ही निवड जाहीर केली. दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण 26 फेब्रुवारी रोजी केले जाईल. या वर्षी एकूण 11 खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जाणार आहे.
प्राइम पॉइंट फाउंडेशनद्वारे ही माहिती देण्यात आली. प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिन्सेस या ई पत्रिकेद्वारे 2010 पासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे सर्वात पहिल्यांदा वितरण 2010 मध्ये चेन्नई येथे झाले होते. आतापर्यंत 75 खासदारांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या मते, यंदा 11 खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. यात लोकसभेचे आठ आणि राज्यसभेचे तीन सदस्य सहभागी आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन आणि शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बार्ने यांचाही समावेश आहे.
तसेच तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा, भाजपचे विद्युत बरन महतो, हिना गावित आणि सुधीर गुप्ता या खासदारांचाही संसद रत्न पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. बीजदचे अमर पटनायक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांना ‘वर्तमान सदस्य’ या श्रेणीत हे पुरस्कार दिले जात आहेत.
डॉ. फौजिया खान यांनी राज्यसभेत भूमी अभिलेखाचे संगणकीकरण करून त्यातून जनतेच्या समस्या तातडीने सोडवून वादांची संख्या कमी करण्यासाठी मुद्दा मांडला होता. त्याची प्रशंसा स्वतः उपराष्ट्रवतींनी सभागृहात केली होती. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण, होतकरू, उमेदवारांना नोकरीच्या संधी बाबतचा विषय, मराठा आरक्षणाचा मुद्दा, अपंगांसाठी वेगवेगळ्या सेवा सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, रेल्वे विषयक नागरिकांच्य अडचणी दूर करण्याचा मुद्दा, तसेच अल्पसंख्यांकाचे आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. हे विषय त्यांनी अत्यंत कमी वेळेत प्रभावीपणे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. या कामगिरीचे मूल्यांकन झाल्यानंतर संसद रत्न पुरस्कारांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.