राज्यात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणण्याबाबत पडताळणी केली जात आहे. याबाबत राज्य सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण, वेगवेगळय़ा राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्रद्धा वालकर प्रकरणामुळे ‘लव्ह जिहाद’वरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, अन्य राज्याच्या कायद्याचा अभ्यास केला जाणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात सध्या हा विषय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या काही खासदारांनी आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याबाबत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी, राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी कुणीही भेटत असेल तर उत्तमच आहे. शिंदे गटाचे खासदार स्वतंत्रपणे नरेंद्र मोदींना भेटले आहेत. ते भेटतच असतात. त्यामुळे पुन्हा यांच्यासोबत त्यांनी जायला पाहिजे, असे काही नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘ठाकरे सरकारमुळे प्रकल्प रखडले’
नागपूर मेट्रो आणि नागनदी या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हे प्रकल्प ठाकरे सरकारमुळे रखडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही दोन प्रकल्पांचे नियोजन केंद्राकडे पाठवले होते. त्यात नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. २०१९ साली हे प्रकल्प मान्यतेच्या पातळीवर आले तेव्हा केंद्राला काही छोटय़ा शंका होत्या. पण महाविकास आघाडीने त्या शंकांचेही निरसन न केल्यामुळे दोन-अडीच वर्षे हे दोन्ही प्रकल्प रखडल्याचे फडणवीस म्हणाले.