महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात दिल्ली संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना सामना जिंकून आरसीबीला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली. यासह आरसीबी संघाचा महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा पराभव झाला.
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये आरसीबी विरुद्ध दिल्ली कपिटल्स यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबी संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना या सामन्यातही कमाल दाखवू शकली नाही आणि केवळ 8 धावा करून बाद झाली. दिल्लीच्या संघाच्या भेदक गोलंदाजी समोर आरसीबी संघाला 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 150 धावांपर्यंतच मजल मारता आली.
विजयासाठी 151 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनाही बंगळुरुच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. स्टार फलंदाज शफाली वर्मा शून्यावर बाद झाली. परंतु जेमिमा रॉड्रिग्जने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानंतर मारिझान काप आणि जेस जोनासनच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला.