भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या दोन टी-20 मॅचच्या सीरिजला रविवारपासून सुरूवात होणार आहे. रविवार आणि मंगळवारी दोन टी-20 मॅच होणार आहेत. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे या सीरिजमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत इंग्लंडमध्ये असल्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे प्लेयिंग इलेव्हनमध्ये असणार हे जवळपास निश्चित आहे.
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएलच्या काही मॅच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सीरिज खेळू शकला नव्हता. दुसरीकडे संजू सॅमसनसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही शेवटची संधी असेल. टीमकडे संजू सॅमसनऐवजी दीपक हुड्डाचा पर्याय उपलब्ध आहे. दीपक हुड्डा बॅटिंगसोबत ऑफ स्पिन बॉलिंगही करू शकतो. तसंच राहुल त्रिपाठीही टीममध्ये आहे.
ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये फार यश मिळालं नव्हतं. असं असलं तरी आयर्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये ऋतुराज ओपनिंगला खेळेल हे निश्चित मानलं जात आहे. इशान किशनने मागच्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमधलं टीम इंडियातलं स्वत:चं स्थान निश्चित केलं आहे.
या सीरिजसाठी कर्णधार असलेला हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या क्रमांकावर खेळला होता. या सीरिजमध्येही पांड्या त्याच क्रमांकावर खेळेल. तर दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला येईल. आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंगला या सीरिजमध्ये तरी संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. फास्ट बॉलरमध्ये भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान तर स्पिनर म्हणून अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल कायम राहतील.
भारतीय टीम
ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, रवी बिष्णोई, युझवेंद्र चहल