जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे. लष्कराचं ‘ऑपरेशन रक्षक’ सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्यातील खटाव गावचे ते सुपूत्र असून त्यांच्या जाण्यानं खटावसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
शहीद जवान सुरज प्रताप शेळके तीनच वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला झालं होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षकदरम्यान वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.
महिन्याभरातच वडूजमधील तिसरा जवान शहीद:
सातारा जिल्ह्याला सैनिकांची परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेक तरूण सैन्यामध्ये जाऊन देशसेवा करत असतात. अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. साताऱ्यातील वडूज तालुक्यालाही सैनिकांची मोठी परंपरा आहे. याचंच दर्शन या महिन्याभरात दिसून आलं. या एक महिन्याच्या काळात वडूज-खटाव मधील तीन जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं. गेल्या महिन्यात लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले होते. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही वीरमरण आलं होतं. 22 मराठा लाईट इन्फण्ट्रीमध्ये ते सुभेदार होते.त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला 11 जून रोजी वडूज तालुक्यातील भुरकवडीचे सुपुत्र जवान संग्राम फडतरे जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये शहीद झाले होते. सुभेदार विजय सर्जेराव शिंदे, संग्राम फडतरे आणि आता सुरज शेळके याच्या जाण्यानं खटावसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.