महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेत पंढरपूरच्या यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सोपानदेव, संत एकनाथ, अशा अनेक संतांच्या मांदियाळीत हजारो किलोमीटर पायी चालत येऊन पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याचं भाग्य आणि ती ताकद फक्त वारकऱ्यांच्या आणि भक्तांमध्येच आहे. ही वारीचं सुंदर दृष्य पाहून भान हरपून जातं. विठुरायाच्या भक्तीत प्रत्येक जण तल्लीन होत जातो.
ज्ञानेश्वर माऊली… ज्ञानराज माऊली… तुकाराम… या नामघोषात भक्तीभावाने आळंदी आणि देहू या ठिकाणांहून वारकरी संप्रदायाच्या या 2 पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान करतात. यावेळी तब्बल 15 लाख वारकरी एकरुप होऊन विठुरायाच्या दर्शनाला निघतात.या वारकऱ्यांच्या सेवेसाठी खास पुणेकर तत्पर असतात. कारण, ज्यांना वारीला जाणं शक्य होत नाही; ते सर्व पुणेकर वारकऱ्यांची सेवा करून आपलं विठ्ठलाप्रती असणारं दायित्व रितं करतात.
वारीच्या परंपरेला हजार वर्षांचा इतिहास आहे. ही वारी अशीच अव्याहतपणे अनेक शतकानुशतकं चालूच आहे. या वारीसोबत अनेक सुंदर प्रसंगदेखील आपल्याला पहायला मिळतात. इथे सर्व भेदाभेद, सर्व अमंगळ गळून पडतात.स्त्री-पुरुष, लहान-थोर सगळीकडे माऊली माऊली म्हणत वातावरण विठ्ठलमय होऊन जातं. कोणी एकमेकांची गळाभेट घेतं, तर काही जण फुगडी खेळून एकमेकांच्या पाया पडतात. यावेळी समोरची व्यक्ती ओळखीची असतेच असं नाही. अशावेळी ओळखीची गरजही उरत नाही.सहसा फुगडी खेळणं स्त्रियांच्या खेळाचा प्रकार मानला जातो. पण वारीमध्ये तुम्हाला अनेक पुरुष वारकरी एकमेकांशी फुगडी खेळताना दिसतात. तर ते आपल्या स्त्री-पुरुष भेद बाजूला सारून एकमेकांशीदेखील फुगडी खेळतात.
काहींच्या घराण्यांमध्ये चालत आलेली वारकरी परंपरा ते आपल्या चिमुकल्यांसोबत देखील जोपासतात. अशा वारीमध्ये अनेक चिमुकली चिमुकली मुलं वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये दिसतात, तेव्हा ते सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.हौसेने त्यांना टाळ, चिपळ्या, माथी भगवा फेटा, पांढरे वस्त्र आणि धोतर नेसून गोड चिमुकली मुलं वारीमध्ये सहभागी होतात. तितक्याच तन्मयतेने मोठी माणसंही या चिमुकल्यांसोबत टाळ-मृदुंग वाजवतात. माऊली-विठुरायाचा नामघोष करतात.
या वारीमध्ये स्त्रियादेखील छोट्याशा तांब्या-पितळाच्या वृंदावनातली तुळस डोईवर घेऊन सहभागी होतात. या वृंदावनावर पांडुरंग-रुक्मिणीचे मूर्ती असते, तर कधी श्रीकृष्णाची! संपूर्ण वारीमध्ये ही तुळस त्यांच्यासोबत एखाद्या मैत्रिणीसारखेच असते. या वारीत विठ्ठल-रुक्मिणीची काळा पाषाणाची सुंदर घडीव मूर्ती स्त्रिया दिसतात.प्रचंड अशी गर्दी असणाऱ्या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण वारीमध्ये स्वच्छता पाळली जाते. तसेच वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पदेखील उभारले होते.सर्वसामान्य नागरिकांकडून वारकऱ्यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली होती. पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यामध्ये सर्व धर्माचे लोक वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर असतात. अमाप अशी गर्दी यावेळी वारीमध्ये पहायला मिळाली.