भारतीयांसाठी एक अभिमानाची बातमी आली आहे. ज्या इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या देशाच्या सर्वोच्च पदावर भारतीय व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर पोहोचले आहेत. मतदानाची पहिली फेरी त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांची मते मिळविण्यासाठी झाली, ज्यामध्ये ते इतर सर्व उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना 88 खासदारांची मते मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेनी मॉर्डंट यांना 67 मते मिळाली आहेत. अशा प्रकारे सुनक 21 मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री राहिलेल्या ट्रस लीज यांना केवळ 50 मते मिळाली. तर अर्थमंत्री नदीम जावी आणि माजी कॅबिनेट मंत्री जर्मी हंट या फेरीतून बाहेर पडले आहेत.
पक्षाला निष्कलंक प्रतिमेचा पंतप्रधान हवाय
विशेष म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक भारतीय वंशाच्या संसद सदस्य अॕटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन याही उतरल्या आहेत. मूळच्या गोव्यातील असलेल्या सुएला ब्रेव्हरमन सध्या ब्रिटीश मंत्रिमंडळात अॕटर्नी जनरल आहेत आणि 2015 पासून खासदार आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी एका खासदाराला किमान 20 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो.
बोरिस जॉन्सन यांच्या उत्तराधिकारीची घोषणा 5 सप्टेंबरला होणार
निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, बोरिस जॉन्सन यांच्या उत्तराधिकारी म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते 5 सप्टेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत. त्याआधी पक्षाला स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसवायचे आहे. कारण गेल्या काही वर्षांत अनेक घोटाळ्यांमुळे पक्षाची लोकप्रियता घसरली आहे. ही लोकप्रियता परत मिळवण्यासाठी पक्षाला मजबूत आणि स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान बनवायचा आहे.
ऋषी सुनक हे 2015 पासून यूकेचे खासदार आहेत. ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री होते. याआधी ते थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये कनिष्ठ मंत्रीही होते. ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे, जी भारतातील अब्जाधीश एन नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांच्या राजीनाम्यानंतरच अनेक मंत्र्यांनीही आपली पदे सोडली. सरकारमधून बाहेर पडणाऱ्या अनेक मंत्र्यांच्या दबावामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही राजीनामा द्यावा लागला.