नवरात्रीच्या दिवशी अष्टमीला मोठे महत्त्व आहे. या दिवशी देवीची महागौरी माता या रूपामध्ये पूजा केली जाते. महागौरी हे आदिशक्ती गौरीचे आठवे रूप आहे. महागौरी दुर्गामाता ही शंख, चंद्र किंवा कुन्द पुष्पाप्रणाणे अतिशय सुंदर आणि मोहक आहे. या देवीचा रंग गोरा आहे. या देवीची कशी पूजा करावी याची माहिती पंडित वसंत गाडगीळ यांनी दिली आहे.
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोदया॥
महागौरीचे रूप हे सर्व सजीवांमधील आतील सौंदर्य आणि शुद्धता दाखवते. आजच्या दिवशी कुमारिका पूजनालाही महत्त्व आहे. या देवीचे वाहन बैल आहे. देवीला चार भुजा (हात) आहेत. देवीनं या हातामध्ये अभयमुद्रा, त्रिशूल, डमरू आणि वरमुद्रा धारण केले आहे. देवीची शक्ती अमोघ आणि तातडीनं फळ देणारी आहे. सर्व संचित पापांचा नाश करून दैन्य-दु:ख पळवून लावण्याचे सामर्थ्य या देवीच्या पूजनाने होते. अष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये घागरी फुंकण्याचा विधी देखील केला जातो, असे गाडगीळ यांनी सांगितले.
महागौरीने महादेव पती म्हणून मिळवा म्हणून कठोर तपश्चर्या केली. यामुळे तिचे शरीर काळे झाले, परंतु तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिचे शरीर गंगेच्या पवित्र पाण्याने धुवून तेजस्वी केले. त्यामुळे तिचे रूप गौर वर्णाचे झाले. म्हणूनच तिला महागौरी म्हटले गेले. ती अखंड फलदायी आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.
देवीला मुलींचे प्रतिक मानले जाते. नवरात्रीचे सर्व दिवस कन्या पुजनेला विशेष महत्त्व आहे. त्यामध्येही अष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये कन्यापूजन करून उपवास सोडला जातो. कालाष्टमी म्हणूनही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: बंगालमध्ये हा दिवस रात्रभर देवीसमोर जागरण करून साजरा केला जातो, अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.