काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी पक्षाचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रभारी यांची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वसामान्यांशी संबंधित महागाईच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर प्रमुख चर्चा होणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी या बैठकीत कॉंग्रेसचे बडे नेते पेट्रोल-डिझेल आणि महागाईच्या वाढत्या किंमतींविरोधात आंदोलन करण्याची रणनिती आखू शकतात. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरूद्ध देशव्यापी निदर्शने केली. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत आणि बऱ्याच राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना संसर्गासंदर्भात कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणावरही चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकांसारख्या मुद्द्यांसह सद्यस्थितीतील घडामोडी आणि इतर राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक 24 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
दुसरीकडे 2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. दोन दिवस त्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार प्रशांत किशोर यांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे, कारण अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले आहेत. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते शरद पवारांच्या घरी एकवटत आहेत. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.