चारच दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दोन गावांमध्ये विहिरीतील दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू आणि 47 जण आजारी पडले होते. ही घटना ताजी असताना आता आणखी एक भितीदायक बातमी अमरावती जिल्ह्यातून समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात कॉलरा आजाराने कहर केला आहे. 8 दिवसात कॉलराचे 181 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासन अलर्टवर
अमरावती जिल्ह्यात अवघ्या 8 दिवसात कॉलराचे 181 रुग्णांची नोंद झाली आहे. तर यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले म्हणाले की, दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना कॉलरची लागण झाली आहे. यासाठी प्रत्येकाची वैयक्तिक वैद्यकीय तपासणी करून त्याला होणाऱ्या नुसार त्यांना औषधोपचार करण्यात येत आहे. तर प्रत्येकाला ओ आर एस पावडर दिल्या जात आहे. घटनेचे मूळ कारण शोधल्यानंतर गावात सध्या मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मेळघाटमध्ये दूषित पाणी प्यायल्याने तिघांचा मृत्यू, 47 जण गंभीर
जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 47 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणातील बाधितांची संख्या ही 231 इतकी झाली आहे