कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील कित्येक जण आपापल्या गावी परत गेले होते. यामध्ये बहुतांश आयटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अनेकांना नोकरी गेल्यामुळे, तर काहींना वर्क फ्रॉम होम सुविधा मिळाल्यामुळे आपलं गाव गाठावं लागलं होतं. शहरात असलेल्या सोयी-सुविधा खेड्यात मिळत नाहीत हे पाहून यातील कित्येक लोक लॉकडाउन उठताच पुन्हा शहराकडे पळाले. मात्र, मध्य प्रदेशातील एका तरुणीने गावाचाच कायापालट करण्याचा निर्णय घेतला. गावात विकासकामं करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली, आणि ती सरपंच झाली. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. जिल्ह्यातील ठूटी गावात आकांक्षा कौरव ही 30 वर्षांची तरुणी सरपंच म्हणून निवडून आली आहे. तीन जणांना या निवडणुकीत हरवत तिने ही कामगिरी केली. तिच्या विरोधात असलेल्या एका उमेदवाराला 28, दुसऱ्याला 47 तर तिसऱ्याला 188 मतं मिळाली. आकांक्षाला एकूण 557 मतं मिळाली. म्हणजेच, एकूण 377 अशा मताधिक्याने लोकांनी तिची सरपंच म्हणून निवड केली आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आकांक्षा
आकांक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तिने आयटी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने दोन वर्षं सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं. त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेसाठी तयारी सुरू केली. शहरात तिची यूपीएससीची तयारी सुरू असतानाच कोरोना महामारीची लाट आली. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे आकांक्षा पुन्हा आपल्या गावी परतली.
गावाचा विकास करण्याचा निर्णय
शहरातून गावात आल्यानंतर आकांक्षाला जाणवलं की, गावात कित्येक सुविधांचा अभाव आहे. याबाबत तिने ग्रामस्थांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, की शिकले-सवरलेले लोक संधी मिळताच गावातून निघून शहरात जातात. तर मग गावाचा विकास कोण करणार? शिकलेल्या लोकांनीदेखील गावात थांबलं पाहिजे. यानंतर मग आकांक्षाने गावातच थांबून गावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला.यासाठी तिने सरपंचपदाच्या निवडणुकीत आपली उमेदवारी घोषित केली. गावातील लोकांनीही तिच्यावर विश्वास दाखवत तिला निवडून दिलं आहे. आता गावातील लोकांच्या समस्या दूर करून, आपण गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं आकांक्षाने म्हटलं आहे.