दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवाविरुद्ध एका महिलेवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 71 वर्षीय पीपी माधवन असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं की, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
डीसीपी (द्वारका) हर्षवर्धन म्हणाले, “71 वर्षीय व्यक्तीवर आरोप लावण्यात आलेले आहेत. ते एका ज्येष्ठ राजकीय नेत्याकडे पीएस म्हणून कार्यरत आहेत. 25 जून रोजी तक्रार प्राप्त झाली. IPC कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने माधवनवर नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार आणि छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. महिलेने सांगितलं की 2020 मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान तिचा नवरा गमावल्यानंतर काहीच काळात ती आरोपीला भेटली. तिचा नवरा पक्ष कार्यालयात मदतनीस म्हणून काम करायचा. नोकरीच्या शोधात ती अनेकदा काँग्रेस कार्यालयात जात असे.