राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्ष आणि बंडखोरीच्या घटनांमध्ये थेट जम्मू आणि काश्मीरमधून एक मोठी आणि मन सुन्न बातमी समोर येतेय. महाराष्ट्राच्या शिरूर तालुक्याचे सुपुत्र सूर्यकांत शेषराव तेलंगे यांना वीरगती प्राप्त झाली आहे.काल सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सूर्यकांत यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली मात्र यात त्यांना वीरमरण आलं.
सूर्यकांत शेषराव तेलंगे वय वर्ष 35 हे मूळचे शिरूर तालुक्यातील थेरगाव इथे राहणारे होते. काल सकाळी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना सूर्यकांत हे शाहिद झाले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या गावात प्रचंड मोठी शोककळा पसरली आहे. गावातील सर्वांनी दुकानं बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सूर्यकांत हे 2007 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सैन्य प्रशिक्षण ही महाड इथून घेतलं होतं. तसंच 2014 साली त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या मागे आई, वडील पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या शहीद होण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जम्मू-काश्मीर इथे सतत दहशतवाद्यांकडून छुपे हल्ले होत असतात. यामध्ये देशभरातील अनेक जवान शहिद होतात. मात्र या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रानं एक वीरपुत्र गमावला आहे.