लोकल सेवा सुरु
होण्याची शक्यता
मुंबईकरांना पुढील आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाच स्तरापैकी पहिल्या पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकलसेवेबद्दल काय निर्णय होणार हे एकदोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
१२ दिवसांपासून मजूर
खाणीमध्ये अडकले
एका बेकायदेशीर कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या पाच मजुरांना सोडवण्यासाठी मेघालय सरकारने शेवटी नौदलाची मदत मागितली आहे. गेल्या १२ दिवसांपासून हे मजूर या खाणीमध्ये अडकलेले आहेत. मेघालयातल्या खाणीतल्या डायनामाईटच्या स्फोटामुळे ह्या खाणीमध्ये पाणी भरल्याने हे मजूर अडकल्याचं कळत आहे.
परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च
न्यायालयाने फेटाळली
आयपीएस अधिकारी आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष म्हणजे, ही याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाहीत. सिंग यांनी जवळपास ३० वर्षे पोलिस दलात सेवा बजावली आहे. असे असताना ते आता राज्य पोलिस दल आणि गृह मंत्रालय प्रशासनाच्या चौकशीवर विश्वास नसल्याचे सांगत आहेत. असा पवित्रा ते कसा घेऊ शकतात, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या
लोकांना लसीकरणाची गरज नाही
कोरोनातून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी, अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात आहेत. सरकारकडूनही वेगवेगळ्या पातळीवर आढावा घेऊन माहिती दिली जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या गटाने मोदी सरकारला एक वेगळाच सल्ला दिला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या लोकांना लसीकरणाची गरज नाही, असे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच अंधाधुंद आणि अपूर्ण लसीकणामुळे कोरोना विषाणूच्या विविध अवतारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यांच्या लसीकरणाची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
१० मानाच्या प्रमुख पालख्यांना
परवानगी देण्याचा निर्णय
आषाढी वारी पालखी सोहळ्यातील १० मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले की, देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. तर उर्वरित ८ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावलीची माहिती दिली.
दुसरी लाट ओसरत असली तरी
मृत्यूदर चिंताजनक स्थितीत
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असली तरी मृत्यूदर चिंताजनक स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजार मृत्यू प्रतिदिवसावर स्थिर झालेला आकडा ९ जूनला अचानक ६ हजारांच्यावर पोहोचला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बिहारमध्ये कोरोना मृत्यूदर जवळपास ७३ टक्क्यावर गेल्याने हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ७ जून २०२१ पर्यंत बिहारमध्ये कोरोनामुळे ५,४२४ लोकांचा मृत्यू झाला होता.
एटीएम मधून पैसे काढताना
जादा शुल्क आकारणी
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीचा कर्ज असो की बचत खाते असो बँकेशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंध येतोच. त्यातही जास्त संपर्क टाळण्यासाठी कोरोना काळात आता पैसे काढण्यासाठी प्रामुख्या एटीएमचा वापर करण्यात येतो. परंतु एटीएम मधून पैसे काढणे देखील आता ग्राहकांसाठी जणू काही कठीण झाले असून यासाठी जादा शुल्क आकारणी होत असल्याने त्याचा भुर्दंड सर्वांना बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम व्यवहारासंदर्भातील नियमांमध्ये विविध बँकांना बदल करण्याची मुभा दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
जी-७ शिखर परिषदे जाणार
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ आणि १३ जून रोजी, जी-७ शिखर परिषदेच्या आऊटरिच सेशन्स म्हणजेच जनसंपर्क सत्रात आभासी स्वरूपात सहभागी होणार आहेत. सध्या इंग्लंड जी ७ परिषदेच्या अध्यक्षस्थानी असून, भारतासह, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक मिश्र स्वरूपात होणार आहे. या परिषदेची संकल्पना बिल्ड बॅक बेटर” म्हणजेच ‘उत्तम पद्धतीने पुन्हा उभारणी’ अशी आहे.
सिलिंडर रिफिल करण्यासाठी
वितरकाची निवड करता येणार
जर तुम्ही स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एलपीजी सिलिंडर वापरणार्यांना एक खास सुविधा दिली आहे. ग्राहकांना आता सिलिंडर रिफिल (पुनर्भरण) करण्यासाठी वितरकाची निवड करता येणार आहे. ही परवानगी देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील गॅस कंपनीच्या कोणत्याही वितरकाची निवड करता येणार आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या रूपाने ही सुविधा चंडीगड, कोयम्बतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे सुरू करण्यात येणार असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले.
नवी मुंबई विमानतळाला
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जुलै महिन्यात होणार्या
श्रीलंका दौर्यासाठी संघ जाहीर
भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेली घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्या श्रीलंका दौर्यासाठी संघ जाहीर केला आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
SD social media
9850 60 3590