महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे आज यांचा स्मृतिदिन

जन्म. ८ नोव्हेंबर १९१९ गावदेवी मुंबई येथे

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन. या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला. चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत. ‘पु लं’चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. व पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले. भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले. पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले. सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं. राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला. १९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‌‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे. १९४७ सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्‌ मध्ये पुल व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपट‌ अभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्न नट म्हणून प्रसिद्धीस आले. पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणाऱ्या पु. ल. व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. पु.लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.