आज दि.२८ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सकाळी राऊतांचं वक्तव्य मग मुख्यमंत्र्यांची साद

सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर रोज आक्रमक भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊत यांची आज भाषाच बदलली. सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदारच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केलं. यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा एकदा आमदारांना भावनिक साद घातली. आपल्यातील बरेच जण संपर्कात आहेत, तुम्ही अजूनही मनाने शिवसेनेत आहात, तसंच आमदारांच्या कुटुंबातल्या काहींनी संपर्क साधून मनातल्या भावना कळवल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. याचसोबत कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आता वेळ निघून गेली आहे. आम्ही आमचं म्हणणं दोन वर्ष मुख्यमंत्र्यांना सांगत आलोय, पण काहीच दखल घेतली गेली नाही. याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने घेतला आहे, असं एकनाथ शिंदे न्यूज18 लोकमतशी बोलताना म्हणाले.

‘काय झाडी…काय डोंगर’ फेम आमदाराचं एकनाथ शिंदेंनी केलं तोंडभरून कौतुक

काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या वक्तव्यावर तर गाणं सुद्धा आलं आहे. शहाजी पाटलांच्या या दमदार कामगिरीचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे आणि हॉटेलमध्येच त्यांना डायलॉग म्हणायला लावला.शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तणावपूर्ण वातावरण आहे, पण अशातच आमदार कशी मजाा करताय हे शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी हे पटवून दिलं. शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.

‘मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा,’ सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखाच असावा, असं वक्तव्य केलं आहे. ‘मला उद्धव ठाकरे यांचा अभिमान आहे. बाळासाहेब नसताना उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक आवाहन केलं. मी भविष्य वर्तवू शकत नाही, पण कुटुंबातून कोण सोडून जात असेल, तर त्यांना परत आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.’मी उद्धव ठाकरे यांचं ट्वीट बघितलं. ठाकरे कुटुंबासोबत माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. सरकार येतील आणि जातील पण ही नाती पुढे अशीच सुरू राहतील,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. तसंच आता इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर जारी करण्यात आले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, म्हणून संपूर्ण भूमिपुत्रांचे मोठमोठे आंदोलने झाली. मात्र, सिडकोमध्ये झालेल्या बाळासाहेबांच्या ठरावाला विरोध करतानाच शासनाला अनेक प्रकारे विनंती केल्या. मात्र, तरीही काही होऊ शकले नाही.

आता मात्र, एक मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच संबंधित विषयाकडे लक्ष घालावे आणि दि. बा. पाटील यांच्या नावाला होकार द्यावा, अशी विनंती केली. तर सुभाष भोईर सुभाष भोईर यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याचे समजते.

आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून ही घोषणा

पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. याच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.मध्य रेल्वेने पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे सुरू सुरू केल्या आहेत. त्या 5 ते 14 जुलैदरम्यान चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे नागपूर-सोलापूर-लातूर-अमरावती-मिरज-खामगाव ते पंढरपूर, मिरज-कुडूवाडी दरम्यान चालवल्या जातील. तसेच जादा फेऱ्यादेखील सोडल्या आहेत. यासाठी आरक्षण सुरू झाल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

महाबळेश्वर-प्रतापगड घाट रस्त्यावर माकडाला चिप्स देताना दरीत कोसळलेल्या पर्यटकास दरीबाहेर काढले

महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर माकडाला चिप्स देताना खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीबाहेर काढले. जखमी नेहते हे माकडाला चिप्स देताना कठड्यावरून पाय घसरून सोमवारी दुपारी दरीत कोसळले.संदीप नेहते (सध्या बावधन,पुणे,मूळ मध्यप्रदेश) हे पुणे येथून कुटुंबीयांसह हरिहरेश्वर (जि. रायगड) येथे पर्यटनास गेले होते.तेथून आंबेनळी घाट रस्त्यामार्गे महाबळेश्वर पर्यटनास येत होते.त्यांना जननी माता मंदिरावरील बाजूस रस्त्यानजीक असलेल्या कठड्यावर काही माकडे दिसली. संदीप हे गाडीमधून उतरून या माकडांना चिप्स खायला देण्यासाठी दरीवर असलेल्या कठड्यावर उभे राहिले. रिमझिम पावसाने कठड्यावर आलेल्या शेवाळा वरून त्यांचा पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळले. याची माहिती महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवानांना समजताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अकोला जिल्ह्यात वाघ मृतावस्थेत आढळला

बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी खु.शिवारातील जंगलात मंगळवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला.पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोझरी खु.शिवारात आज सकाळी एका शेतकऱ्याला वाघ मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.याठिकाणी पिंजरचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक आणि डॉक्टरांचे पथकही पोहोचले. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आघाडी सरकारने काढलेल्या जीआरची माहिती द्या; राज्यपाल कोश्यारींचे मुख्य सचिवांना पत्र

राजकीय अस्थितरता निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने जीआर काढण्याचा सपाटा लावला आहे. याचीच दखल घेत कोश्यारी यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून २२ ते २४ जून या कालावधीत निघालेल्या जीआरची माहिती मागवली आहे. कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आता राज्य सरकारला या तीन दिवसांमध्ये घेतलेल्या शासन निर्णयांची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.महाविकास आघाडी सरकारने मागील आठवड्याभरात वेगवेगळ्या खात्यांची मिळून एकूण ४४३ जीआर मंजूर केले आहेत. सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे सरकारने हा जीआर काढण्याचा सपाटा लावला आहे. विरोधकांनी यापेक्षा अधिक जीआर काढण्यात आल्याचा दावा केला आहे.

अभिनेत्री कश्मिरा करतेय वारकऱ्यांची सेवा

राज्यात दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी वारीमुळे सगळे भक्तीमय होऊन तल्लीन झालेले पहायला मिळत आहे. या वारीमध्ये सगळ्याच क्षेत्रातील लोक सहभागी होत असून उत्साह मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकजण वारीमध्ये सगळ्यांची मदत करताना दिसत आहेत. तर अनेकजण वारीमध्ये सेवा करताना पहायला मिळतायेत. अशातच मराठी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी देखील वारीला गेली असून ती भक्तीभावानं वारीला आल्यांची सेवा करताना दिसत आहे.

महिलेनं एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म! आधीच होत्या तीन मुली

एतमदौला मधील प्रकाश नगर येथील रहिवासी असलेल्या मनोज कुमारची पत्नी खुशबू हिला काही दिवसांपूर्वी आग्रा ट्रान्स यमुना कॉलनी रामबाग येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं तिनं एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिला आहे. ही प्रसूती सोपी नसली तरी डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आई आणि चारही बाळं पूर्णपणे सुरक्षित आहे. विशेष म्हणजे खुशबू आणि मनोजला आधीच तीन मुली आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.