एकनाथ शिंदेंच्या मदतीला आता गुजरात सरकार, आज होणार वाटाघाटी?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता या सत्तासंघर्षामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून अधिकृत एंट्री केली आहे. आता भाजपकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे. गुजरातमधील काही मंत्री हे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये बंडाची बिजं पेरली होती. त्यानंतर आता गुजरातमधील भाजप एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावणार आहे. गुजरात सरकारने मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद पटेल यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील आणि पटेल यांच्यामध्ये एक बैठक झाली आहे.लवकरच सत्तास्थापनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या वाटाघाटींवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याआधी या दोन्ही नेत्यांवर वाटाघाटीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

विशेष म्हणजे, गुजरातमधील भाजपचे ३ मोठे पदाधिकारी हे आज गुवाहाटीमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आज आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. कोणताही मोठा नेता आज गुजरातमध्ये नाही.. पण, खासगी कारण देऊन मंत्रिमंडळाची बैठकच रद्द करण्यात आली आहे. आता बंडखोर आमदारांसोबत वाटाघाटीची चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे. वाटाघाटीची चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गुजरातमधील या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे गटाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाटाघाटीची चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणले जाणार आहे. तशी व्यवस्था करण्याची जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. हे तिघेही गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. भाजपने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच या पत्रासोबत सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा दाखलाही देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.