मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिवस मोठया उत्साहात साजरा करण्याचे आदेश महाराष्ट्रातील प्रत्येक मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. मराठी भाषा गौरव दिवस जितका भव्य करता येईल तितका तो करण्याचे, व त्याचबरोबर त्यात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा या सूचना देखील राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 27 फेब्रुवारी “मराठी राजभाषा” दिनानिमित्त नवी मुंबई मनसे तर्फे नवी मुंबईकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
यामध्ये एक लाख पोस्ट कार्ड घरोघरी जाऊन देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. या पोस्ट कार्डचे अनावरण आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते राजगड, दादर कार्यालय येथे करण्यात आले. नवी मुंबई मनसेच्या या अनोख्या उपक्रमाला अमित ठाकरे यांनी पोस्टकार्डवर शुभेच्छा देत कौतुक देखील केले. सदर प्रसंगी नवी मुंबई मनसेच्या वतीने पहिले शुभेच्छा पोस्टकार्ड मनसे नेते अमित ठाकरे यांना देण्यात आले.
नवी मुंबईकरांना समक्ष भेटून देण्यात येणाऱ्या पोस्ट कार्डवर “मी कपाळी लाविता गंध मराठी भाषेचा, अभिमान माझ्या मातीचा आसमंत जाहला” अशा आशयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पोस्टकार्ड वरील शुभेच्छा जगविख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी स्वतः कॅलिग्राफी केलेल्या आहेत. तसेच या शुभेच्छा सुप्रसिद्ध लेखक राहुल सिद्धार्थ साळवे यांनी शब्दबध्द केल्या असल्याची माहिती नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.