वेगवेगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकारकडून शासकीय नोकरीत सामावून घेतलं जातं. राज्य सरकारकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेगनेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यापैकी खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची राज्य सरकारची एक योजना आहे. राज्य सरकारकडून राज्यभरातील अनेक खेळाडूंना दरवर्षी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय नोकरीत सामील केलं जातं. पण काही खेळाडू याच गोष्टीचा गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गैरफायदा घेणाऱ्या खेळाडूंचा आकडा हा खूप मोठा आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून काही बोगस खेळाडू हे नोकरी लाटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रत्येकालाच खेळामध्ये रस राहिलं हे जरुरी नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. वेगवेगळ्या खेळांमधील खेळाडूंचं देखील तेच असतं. ते प्रयत्नांची पराकष्ठा, प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपल्या आयुष्यात यश संपादीत करतात. त्यातूनच त्यांना शासकीय नोकरी मिळते. पण काहीजण या मेहनती खेळाडूंची थट्टा करत आहेत की काय असं चित्र निर्माण झालं आहे. कारण काहीजण बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून अशा मेहनती खेळाडूंच्या हक्काची नोकरी लाटत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रीडा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
बोगस क्रीडा प्रमाणपत्र तयार करुन सरकारी नोकरी लाटणाऱ्यांची यादी क्रीडा विभागाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या यादीत तब्बल 109 जणांचं नावे आहेत. यापैकी 17 खेळाडूंची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारस सुद्धा आता क्रीडा विभागाने केली आहे. तर 92 जणांचं प्रमाणपत्र खोटं ठरवण्यात आलं. क्रीडा विभागाच्या या पावलामुळे खऱ्या खेळाडूंना नक्कीच न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
माजी क्रीडमंत्री सुनील केदार यांनी या कारवाईवर ‘झी 24 तास’ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “मी मंत्री असताना संबंधित प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर संबंधित प्रकाराची चौकशी सुरु केली होती. त्यावेळेस सुद्धा आम्ही ठाम भूमिका घेतली होती. काही झालं तरी अशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. हे प्रकरण चौकशीसाठी अंतिम टप्प्यात होतं. मला या कारवाईने आनंद आहे. कारण या कारवाईने खऱ्या खेळाडूंना न्याय मिळेल. चुकीच्या पद्धतीने खऱ्या खेळाडूंची नोकरी अशा प्रकारे चोरणे खपवून घेतलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारच्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.