बॉलिवूडमध्ये कोणाचे सूत कधी जुळून येतील याबद्दल काही सांगता येत नाही. पण अनेक वेळा आपण त्यांच्या नात्यांबद्दल आणि ब्रेकअप बद्दल ऐकत असतो. सेलिब्रिटी अनेक वर्षांचं नात तोडतात आणि दुसऱ्यासोबत लग्न करतात. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता शाहिद कपूर यांनी देखील त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार पाहिले. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. एक वेळ अशी होती, जेव्हा सर्वत्र फक्त शाहिद आणि प्रियंकाच्या नात्याची चर्चा असायची.
करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या जवळ आला. शाहिद आणि प्रियंकाने कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या जोर धरू लागल्या. शाहिद आणि प्रियंकाच्या प्रेमाची सुरूवात झाली ती म्हणजे ‘कमीने’ चित्रपटाच्या माध्यमातून.
मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी गोव्यात एका खासगी पार्टीमध्ये साखरपुडा केला, अशी चर्चा होती. यामागील सत्य कधीही समोर आलं नाही. जेव्हा त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगायला लागल्या तेव्हा एका पार्टीनंतर शाहिद प्रियंकाला सोडण्यासाठी तिच्या घरी आला. त्यानंतर प्रियंकाच्या घरी ईडीची धाड पडली तेव्हा देखील शाहीद तिच्या घरी होता. तेव्हा शाहिद कपूरने दरवाजा उघडला होता. ही गोष्ट त्यावेळी वाऱ्यासारखी पसरली होती.
एबीपी न्यूजच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर जेव्हा प्रत्येकजण प्रियंका-शाहिदबद्दल बोलू लागला, तेव्हा प्रियंकाने शाहिदकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. त्यानंतर शाहिद त्यावेळी प्रियंकावर लक्ष ठेवून होता असं देखील सांगण्यात येत आहे. पण, अमर उजालाच्या वृत्तानुसार अभिनेत्री त्यावेळी एका मोठ्या स्टारला डेट करत होती. हेच एकमेव कारण होते की, हळूहळू दोघे विभक्त झाले.
प्रियंकापासून विभक्त झाल्यानंतर शाहीदने मीरा राजपूतसोबत लग्न केलं. शाहिद आणि मीराला एक मुलगी आणि मुलगा आहे. शाहिद कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करतो. तर प्रियंकाने गायक निक जोनससोबत लग्न केलं आहे.