१० टक्के कोळसा आयात करा : ऊर्जामंत्री आर. के. सिंह

देशातील वीजमागणी वाढत असताना कोळसाटंचाईमुळे देशभरातील औष्णिक प्रकल्पांच्या वीजनिर्मितीवर परिणाम होत असल्याची गंभीर दखल घेत केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आयात कोळसा वापरण्याबाबत सूचना दिल्या. एकूण वार्षिक गरजेच्या १० टक्के कोळसा आयात करून तो पावसाळय़ापूर्वी साठवून ठेवण्याची सूचनाही त्यांनी राज्यांना केली.

दुसरीकडे, खुल्या वीजबाजारातील वीजदर १२ रुपयांपर्यंत गेल्याने बुधवारी महावितरणने वीजखरेदी न केल्याने व दुपारी वीजमागणी २४ हजार ६०० मेगावॉटपर्यंत गेल्याने १२ ते ३ या वेळेत वीजचोरी अधिक असलेल्या भागात कमाल १८५० मेगावॉट भारनियमन करण्याची वेळ आली. नंतर तूट कमी होऊन भारनियमनाचे प्रमाण ६०० मेगावॉटपर्यंत खाली आले. गुरुवारसाठी मात्र सुमारे ७ ते ८ रुपये दराने ६५० मेगावॉट वीज खुल्या बाजारातून विकत घेतली जाणार असून, शुक्रवारी सोलापूरचा ६६० मेगावॉटचा वीजसंच सुरू होऊन त्यातूनही वीज मिळेल, असे महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील वीजप्रकल्पांतून ९३३० मेगावॉट वीज तयार करण्यासाठी १ लाख ३८ हजार ७१० मेट्रिक टन कोळशाची गरज असते. पण, त्यापेक्षा सुमारे १० हजार मेट्रिक टन कोळसा कमी उपलब्ध असल्याने राज्यातील औष्णिक वीजप्रकल्पातून ९३३० मेगावॉटपैकी ६८०० ते ७ हजार मेगावॉट वीज तयार होत असून, क्षमतेपेक्षा २३०० ते २५०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीजखरेदी करणे, टाटा पॉवर कंपनीचा कोस्टल गुजरात वीज प्रकल्पासह ७६० मेगावॉटचा करार यासह इतर विविध स्रोतांमधून वीजमागणी भागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

बाजारातील वीज खूप महाग असल्याने वीजखरेदी न करता वीजचोरी जास्त असलेल्या भागात गरजेनुसार भारनियमन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत दुपारी दोन वाजता वीजमागणी २४ हजार ६०० मेगावॉटपर्यंत वाढली आणि १८५० मेगावॉटपर्यंत भारनियमन करण्यात आले. नंतर संध्याकाळी वीजमागणी साडेतीन हजार मेगावॉटने कमी होऊन २० हजार ५०० मेगावॉटपर्यंत आली. त्याचवेळी कोयना जलविद्युत प्रकल्पातून सायंकाळी ५०० मेगावॉटने निर्मिती वाढवून १ हजार मेगावॉटवर नेण्यात आली. गुरवारसाठी एक दिवस आधीच सुमारे ६०० मेगावॉट वीजखरेदीची नोंदणी केल्याने तुलनेत स्वस्त दरात वीज मिळेल. त्याचबरोबर सध्या बंद असलेला सोलापुरातील ६६० मेगावॉटचा संचही शुक्रवारी सुरू होऊन वीजपुरवठा वाढेल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.