एसएमए (SMA) अर्थात ‘स्पायनल मस्क्युलर अॕट्रॉफी टाईप 1’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या 11 महिन्यांच्या गोंडस वेदिका शिंदे या चिमुकलीला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन आज देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. भोसरीमधील सौरभ शिंदे यांना आपल्या 11 महिन्याच्या चिमुकलीला SMA या दुर्मिळ आजाराने ग्रासलं असल्याचं समजलं. त्यावरील उपचाराचा खर्च अफाट असल्याची जाणीवही त्यांना झाली. त्यानंतर निधी उभारणीसाठी विविध माध्यमातून कॅम्पेनिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
वेदिकाला एसएमए आजारावरील ‘झोलगेन्स्मा’ हे तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन दिल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. “वेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं! आपल्या भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे. तिला ‘स्पायनल मस्क्युलर अॕट्रॉफी टाईप १’ हा दुर्मिळ आजार झाला. त्यानंतर या आजारावरील ‘झोलगेन्स्मा’ या १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी निधी उभारण्यासाठी संघर्ष सुरू झाला”, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी दिलंय.
त्याचबरोबर “आज ते १६ कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं. वेदिकासाठी श्री. संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे तसेच ज्या ज्ञात आणि अज्ञात लोकांनी मदतीचा हात दिला, प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले पाहीजे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल”, असं सांगत त्यांनी वेदिकासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
“वेदिकाच्या आई वडिलांच्या जिद्दीला मानाचा मुजरा आणि वेदिकाला भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. वेदिका हिला उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना”, अशा शब्दात वेदिकाच्या आई वडिलांच्या जिद्दीला समाल केला तसंच वेदिकाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थनाही केली.