सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे.यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. यातच आता हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने काय इशारा दिला –
हवामान विभागाकडून राज्यात पुढील 3 दिवस म्हणजे, 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शनिवार-रविवार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुण्यातील चार धरणांमध्ये मागील 24 तासांत इतके पाणी –
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणीपातळीत जवळपास 1 टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत ते 5.45 टीएमसी इतके झाले आहे. गेल्या महिनाभरापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तूट झाली होती. पाऊस आता थोडासा कमी झाला आहे. मात्र, पुढील काही दिवसांत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात –
मुंबई (कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2 ,रत्नागिरी-चिपळूण – 2, कोल्हापूर – 2, सातारा- 1, सिंधुदुर्ग- 1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत. तर नांदेड – 1, गडचिरोली – 1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या –
मुंबई – 3, पुणे- 1, नागपूर- 1 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे – 2, नागपूर – 2 अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 4 तुकड्या कायमस्वरूपी तैनात केल्या आहेत.