म्युकरमायकोसिसचा साथरोग
नियंत्रण कायद्यामध्ये समावेश
भारतात आत्तापर्यंत असलेल्या करोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं केंद्र सरकारने मान्य केलं आहे. कारण या आजाराचा केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. देशभरातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकरमायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद असलेल्या नियमावलींचं पालन करणं आवश्यक ठरणार आहे.
राज्यासमोर म्युकरमायकोसिस
आजाराचा मुख्य प्रश्न
म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस हा आजार सध्या राज्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे राज्याला या संदर्भातल्या औषधांचा पुरवठा वाढवण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पंतप्रधान मोदींनी आज राज्याच्या १७ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी टोपे बोलत होते. या बैठकीसाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हेही उपस्थित होते. टोपे यांनी सांगितलं की, राज्यातली रुग्णसंख्या कमी झाल्याने आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर या दोन्हींचीही कमतरता नाही. राज्यासमोर म्युकरमायकोसिस आजाराचा मुख्य प्रश्न उभा राहिला आहे.
बंगालच्या खाडीत २२ मेपर्यंत
आणखी एक वादळ धडकू शकते
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाच्या धुमाकुळीनंतर आता पूर्वेकडील किनारपट्टीवर वादळाची चाहूल लागली आहे. हवामान खात्याने उत्तर अंदमान सागर आणि पूर्व- -मध्य बंगालच्या खाडीत २२ मेपर्यंत हवेचा दबाव असल्याने आणखी एक वादळ धडकू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. असे झाले तर २६ ते २७ मे या कालावधीत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीलगतच्या शहरांमध्ये हे वादळ धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
आयडीबीआय बँकेतील
समभाग विक्रीच्या हालचाली
आयडीबीआय बँकेतील समभाग विक्रीच्या हालचाली तीव्र झाल्याची बातमी समोर आलीय. मीडिया रिपोर्टनुसार सरकारचा निर्गुंतवणूक विभाग आरएफपी म्हणजेच Request For Proposal साठी पुढील 3-4 आठवड्यांच्या प्रस्तावासाठी विनंती करेल. हे RFP ट्रान्झॅक्शन अॅडव्हायझर नेमण्यासाठी हे दिले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीस मान्यता दिली होती. यानंतर बँकेत बरेच बदल होतील.
शिखर बँक प्रकरणी अण्णा
हजारे यांची मागणी मान्य
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची मागणी मुंबई सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायमूर्तींनी मान्य केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्यास मनाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. अण्णा हजारे यांनी सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींवर संशय व्यक्त केला होता त्यांची तक्रार केली होती. ते प्रकरण रद्द करावं, या पोलिसांच्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेऊन प्रकरण लवकरात संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं अण्णा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
नव्या कंपनीसाठी अदानी यांनी
मोजले 25 हजार कोटी
अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एजीईएल) नव्या उर्जा क्षेत्रात देशातील सर्वात मोठा खरेदी ( अधिग्रहण) करार केला आहे. यासाठी तब्बल २५ हजार ५०० कोटी रुपये अदानींनी मोजले आहेत. या करारा बाबत कंपनीने म्हटले आहे की, एसबी एनर्जी इंडियामधील सॉफ्टबँक ग्रुप (एसबीजी) भारती ग्रुपच्या १०० टक्के समभागांचे अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी शेअर खरेदी करार केला आहे. ३.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २५ हजार ५०० कोटी) मध्ये होत आहे. अधिग्रहणानंतर, एजीईएलची एकूण नूतनीकरणक्षम उर्जा निर्मिती क्षमता २४.३ जीडब्ल्यू पर्यंत वाढली आहे.
मराठा समाजाला न्याय कसा
मिळवून देऊ शकतो यावर बोला : संभाजीराजे
भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २७ तारखेला मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडणार असून त्यानंतर कोणी माघार घेतली तर बघाच असा इशारा आमदार आणि खासदारांना दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षाला घरचा आहेर देत तोडगा सांगा, मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यावर बोला असं आवाहन करत मी काही भाजपाचा ठेका घेतलेला नाही अशा शब्दांत सुनावलं आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने
नक्षलवादी झाले हैराण
छत्तीसगड येथील बस्तर संभागच्या जंगलांमध्ये आश्रयाला असलेल्या नक्षलवाद्यांना सध्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने हैराण करून सोडले आहे. नक्षलवादी संघटनांमध्ये वेगाने पसरत असलेल्या या संक्रमणामुळे अक्षरशः गोंधळाचे वातावरण आहे. खालच्या कॅडरचे पंधराहून अधिक नक्षलवादी गावांच्या दिशेने परत आहेत. नक्षलवाद्यांसोबत बीजापूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर पोलिसांना हाती एक पत्र लागले. त्यातून ही माहिती मिळाली आहे. नक्षलवादी संघटनांमध्ये विद्रोह करून घरी परतलेल्या सर्वांची नावे आणि पत्ता पोलिसांना या पत्रातून हाती लागले आहे. त्यांच्या आत्मसमर्पणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना बोलण्यास परवानगी
नसल्याने ममता बॅनर्जी संतापल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (गुरूवार) पंतप्रधान मोदींच्या दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत, मुख्यमंत्र्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आलं? बोलण्यास परवानगी न देण्यात आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा.
दगडी चाळीचा पुनर्विकास
केला जाणार
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
आई-वडील गमावलेल्या मुलांना
मोफत शिक्षण द्या : सोनिया गांधी
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मागणी केलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील गमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
फडणवीसांनी ई पास
काढला आहे का?
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाउन असून कठोर निर्बंध लावण्यात आलेले असताना देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. फडणवीसांच्या दौऱ्यात करोना संबंधीच्या नियमांचं उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. तसंच फडणवीसांनी ई पास काढला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी
अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्याच्या राज्य सरकारच्या मागणी करणा-या याचिकेवर रात्री सुनावणी झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही मुद्द्यांवर तपास करता येऊ शकतो असे स्पष्टीकरण सीबीआयने दिले आहे. राज्यातील पोलिस दलातील अधिका-याच्या बदल्यांमध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री
जगन्नाथ पहाडिया यांचे निधन
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे रात्री उशिरा निधन झाले आहे. राज्य सरकारने एक दिवस राज्यात शोक जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांना करोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाडिया यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
कोरोना चाचणी घरीच
करण्यास परवानगी
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)ने कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिलीय. पुण्यातील माय लॅबच्या किटलाही मंजुरी देण्यात आलीय. RAT चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोनाबाधित समजले जाणार आहे. त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.
पंतप्रधान, मुख्यमंत्री या दोघांमध्येही
जनतेला भविष्य दिसत नाही : देशपांडे
सद्यपरिस्थितीत पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
नितीन गडकरी पंतप्रधान
असायला हवं होते : नाना पटोले
देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवं होतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाना पटोले म्हणाले, “मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही”
नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा
काळाबाजार, 9 जणांना पकडले
राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही पाहायला मिळतोय. साधारण दीड हजार रुपयांच्या आत किंमत असलेले हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 35 ते 40 हजारापर्यंतही विकलं जात आहे. नाशिक पोलिसांनी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या 9 जणांना मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 85 रेमडेसिव्हीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिलीय.
SD social media
9850 60 3590