गेल्या काही दिवसांपासून 5 जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच विजय वर्धन यांनी दिला आहे. तसेच देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.
हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्रं पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 5 जीमुळे कोरोना होत असल्यांच्या अफवांचं पेव फुटलं आहे. काही असामाजिक तत्त्वांकडून या अफवा पसरविल्या जात आहे. कोरोनाचा आणि 5 जीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वर्धन यांनी पोलिसांना दिले आहेत. काही असामाजिक तत्त्वांकडून अफवा पसरवून 5 जीच्या टॉवरला क्षती पोहोचवण्याचं कामही हो आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. तसेच टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
5 जी आणि कोरोनाचा काहीच संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. देशात अजून 5 जीची टेस्टिंगही सुरू झालेली नाही. केवळ जनतेला संभ्रमित करण्यासाठी सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवांना काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेहे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.