आयपीएलच्या 14 व्या हंगामाला कोरोनाच्या संकटामुळे स्थगिती देण्यात आली होती. पण आता पुन्हा उर्वरीत सामने 31 युएईमध्ये खेळवले जात आहेत. स्पर्धेतील चौथा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) सनरायजर्स हैद्राबादवर (SRH) दमदार विजय मिळवला आहे. तब्बल 8 विकेट्सने दणकेबाज विजय मिळवत दिल्लीने ते का यंदाच्या हंगामात अव्वल स्थानावर आहेत हे दाखवून दिलं. पण पराभूत झालेल्या हैद्राबाद संघातील खेळाडू राशिद खान (Rashid Khan) याने मात्र सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगलं स्थान मिळवलं आहे.
राशिदने 8 सामन्यात 11 विकेट्स घेत पाचवं स्थान पटकावलं आहे. तर पहिल्या पर्वापासून अव्वल स्थानावर असणारा आरसीबीचा हर्षल पटेल (8 सामने 17 विकेट) पहिल्या स्थानावर कायम आहे. राशिदने आजच्या सामन्यात 4 षटकांत 26 धावा देत 1 विकेट घेतली.
सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला हैद्राबादचा निर्णय साफ चुकिचा ठरला. संघातील एकाही खेळाडूला 30 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. संघाकडून सर्वाधिक धावा या युवा खेळाडू अब्दुल समाद याने केल्या असून त्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याशिवाय राशिदने 22 धावा केल्या. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील बेस्ट फलंदाज केन विल्यमसनही आज केवळ 18 धावाच करु शकल्याने हैद्राबाद केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला.
त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोखरित्या पार पाडली. सलामीला आलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvu Shaw) यांनी चांगली सुरुवात केली. पण 11 धावा करुन शॉ बाद झाला तरी शिखरने मात्र धडाकेबाज फलंजाजी सुरुच ठेवली. त्याने 37 चेंडूत 6 षटकार आणि एक चौकार ठोकत 42 धावा केल्या. ज्यानंतर उर्वरीत जबाबदारी कर्णधार ऋषभ पंत (नाबाद 35) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 47) यांनी पार पाडत संघाला 8 विकेट्सनी दमदार विजय मिळवून दिला.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-5 गोलंदाज
- हर्षल पटेल (आरसीबी) – 8 सामने 17 विकेट-
- आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)- 9 सामने 14 विकेट
- ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स)- 8 सामने 14 विकेट
- अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स)- 7 सामने 12 विकेट
- राशिद खान (सनरायजर्स हैद्राबाद)- 8 सामने 11 विकेट