जगातल्या पहिल्या महिला तबलावादक डॉ.अबन मिस्त्री यांचा आज जन्मदिन

पहिल्या महिला तबलावादक ठरलेल्या डॉ.अबन मिस्त्री यांनी वयाच्या चौथ्या वर्षी प्रथम मेहरू वर्किंग बॉक्सवाला यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पंडित लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे त्या गाण्याचं शिक्षण घ्यायला लागल्या. तबलावादनातलं वेगळेपण व तालातल्या नादमाधुर्यानं १७ व्या वर्षी त्यांना आकर्षित केलं आणि त्या तबलावादनाकडे वळल्या. पंडित केकी जिजीना आणि तबलानवाज़ उस्ताद आमीर हुसेन खाँ या दिग्गजांकडे त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतलं. दिल्ली, फारुखाबाद, अझर्दाबाद आणि बनारस या तबल्यातील चारही घराण्यांचं प्रशिक्षण घेऊन, त्यातून त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली घडवली. पंडित नारायणराव मंगळवेढेकर यांच्याकडून त्यांनी पखवाज वादनातील बारकावे समजून घेतले. संगीत विशारद, संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्या संपादन केलेल्या अबन यांनी सतारवादन व कथक नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं. त्या नामवंत संगीतज्ञ तर होत्याच; पण प्राध्यापक आणि संशोधक सुद्धा होत्या. संस्कृत आणि हिंदी या दोन्ही भाषांमधली ‘साहित्यरत्न’ पदवी त्यांना मिळाली होती. पीएच. डी. करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या गाइड म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना सूरसिंगार संसदेकडून ताल मणी, आग्रा संगीत कला केंद्राकडून संगीत कलारत्न, संगीतसेतू आदी उपाध्या प्रदान करण्यात आल्या होत्या. तबलावादनाचं प्रशिक्षण घेऊन त्यात प्रावीण्य मिळवलं असलं, तरी त्या काळी केवळ पुरुष गायकच नव्हे, तर गायिकासुद्धा त्यांना तबल्याच्या साथीसाठी घ्यायला नकार द्यायच्या. एक स्त्री तबल्यावर साथ करू शकते, यावर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून मग त्यांना आपण एक उत्तम संगीत कलाकार आहोत हे सिद्ध करणं भाग पडले. यासाठी त्यांनी १९७३ मध्ये स्वतःच्या तबलावादनाची पहिली स्वतंत्र रेकॉर्ड काढली. असं करणाऱ्याही त्या पहिल्याच महिला होत्या. तबलावादनाचं हे ज्ञान त्यांनी आपल्या पुस्तकांमधून सर्वांपर्यंत पोहोचवलं आहे. त्यांनी लिहिलेलं ‘तबला और पखावज के घराने एवम् परंपराएँ’ हे पुस्तक अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. ‘तबले की बंदिशें’ हे त्यांचे पुस्तक कलाकारांबरोबरच संगीतप्रेमी व विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेले लेख, स्तंभलेख व शोधनिबंध अभ्यासपूर्ण आहेत. भारतासह रशिया, अमेरिका व युरोपीय देशांतल्या अनेक संगीत सभांमध्ये त्यांनी तबलावादन केलं होतं. तबला ही त्यांच्यासाठी फक्त एक कला नव्हती, तर तो त्यांचा श्वास होता, जगण्याची ऊर्मी होती. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या प्रसारासाठी त्यांनी आपले गुरू पंडित केकी जिजीना यांच्यासह ‘स्वर साधना समिती’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच अप्रसिद्ध कलाकारांना संधी दिली. जगातल्या पहिल्या महिला तबलावादक म्हणून डॉ. अबन मिस्त्री यांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली होती. डॉ. अबन मिस्त्री यांचे ३० सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.