ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दुआ यांनी आज (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.दुआ यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, अवघ्या काही मिनिटांपूर्वी विनोद दुआ यांची कन्या मल्लिका दुआ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याची दु : खद बातमी दिली आहे.
ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण
देशात आढळला
करोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणारा ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये या प्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
शिक्षिकेचा शाळेतच आत्महत्येचा प्रयत्न,मुख्याध्यापकासोबत वादाची किनार
बीड तालुक्यातील राजेवाडी येथील मुख्याध्यापक व शिक्षिकेचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज संगिता राठोड या शिक्षिकेने शाळेच्या नव्या इमारतीत विषप्राशन केल्याने खळबळ उडाली.राजेवाडी येथे जिल्हा परिषदेची चौथी पर्यंत शाळा भरत असून या ठिकाणी आठ शिक्षक काम करतात. या शिक्षकांपैकी मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड व शिक्षिका संगिता राठोड यांच्यात मागील 2-3 वर्षापासून वाद आहे. हा त्यांचा वाद गावक-यांनी अनेक वेळा मिटवला. मात्र, अद्यापही सुरु आहे. मागील महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक जिंकलवाड आणि शिक्षिका राठोड या दोघांत पुन्हा वाद झाले. यामुळे गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्य गेटलाच कुलुप लावले. जोपर्यंत दोघांपैकी एकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलुप उघडण्यात येणार नसल्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलून दाखवला
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या
परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या तयारीत सध्या परिक्षार्थी गुंतले आहेत. त्यातच आता आयोगाने आगामी वर्षातल्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यातील 105 नगरपरिषदांचा
निवडणूक कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात साक्रीचाही समावेश असून , यानुसार 21 डिसेंबरला मतदान आणि दसऱ्याच दिवशी 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. निवडणुकीत अर्ज दाखल करण्यास 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
अभिनेते अमोल पालेकर, अच्युत
गोडबोले यांना पुरस्कार जाहीर
सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना सामर्थ्यवान पत्रकारितेसाठी ‘सव्यसाची पत्रकार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ पुरस्कार तर मूळचे सोलापूरचे चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रूपये आणि मानपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या १० डिसेंबर रोजी सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला आहे.
माझ्या नावावर कुणालाही
घाबरण्याची गरज नाही : आदित्यनाथ
माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचं पालन करेल, काद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल त्याला अत्यंत सन्मानाने आणि गौरवाने उत्तर प्रदेशमध्ये राहाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुणी कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुणीही असला तरी त्याच्यावर कायदा कारवाई करेल”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लीमांना घाबरवलं जातं, आम्हाला मत द्या नाहीतर योगी (आदित्यनाथ) येतील असं सांगितलं जात असल्याचं न्यूज अँकरनं म्हणताच योगी आदित्यनाथ यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.
पाकिस्तान मध्ये श्रीलंकन नागरिकाची,
हत्या मृतदेह रस्त्यावर जाळला
पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये कारखान्यातील कामगार आणि इतरांच्या जमावाने एका कारखान्याच्या श्रीलंकन निर्यात व्यवस्थापकाची हत्या केल्यानंतर आणि त्याचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, श्रीलंकन नागरिकाच्या लिंचिंगमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
यांच्या विरोधात महिलेची तक्रार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नेत्यांच्या बैठकीदरम्यान महिला भाजपा आमदारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे सध्या ते वादात सापडले आहे. या टिप्पणीमुळे अस्वस्थ झालेल्या या महिला आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. २९ नोव्हेंबरला झालेल्या या बैठकीत हा प्रकार घडला. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाची बैठक झाली.
न्यूझीलंडचा पहिला डाव
अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना आज या कसोटीचा दुसरा दिवस असून भारताने आज ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाजच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.
SD social media
9850 60 3590