आज दि.१ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सिलेंडरच्या किमती
वाढवण्यात आल्या

नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. तेल कंपन्यांनी LPG गॅसच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ केली आहे. या किमती १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर (कमर्शियल एलपीजी सिलिंडर) वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या रंगाच्या सिलिंडरची दिल्लीतील नवीन किंमत आता २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे. १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २ हजार ३५५. ५० रुपयांना मिळणार आहे.

देशावर ब्लॅक आऊटचं संकट
5 दिवस पुरेल एवढाच कोळसा

देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. देशात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट आहे आणि ही लाट आणखी तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे. तापमानात अधिक वाढ होणार आहे. त्यातच या दिवसात कडक उन्हात देशभरातील लोकांना वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ‘पीक अवर’मध्ये देशातील विजेची मागणी 207,111 मेगावॅटच्या विक्रमी पातळीवर पोहोचली.

न्यायालयीन कामकाजासाठी स्थानिक
भाषांचा वापर करण्यात यावा : पंतप्रधान मोदी

न्यायालयीन कामकाजासाठी स्थानिक भाषांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. न्यायालयीन कामकाज स्थानिक भाषांमध्ये केल्यास सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल आणि त्यांचे तिच्याशी भावनिक नाते निर्माण होईल, असे प्रतिपादनही मोदी यांनी केले. मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीच्या संयुक्त परिषदेत भाषण करताना मोदी म्हणाले, ‘‘संसदेने केलेले कायदे सर्वसामान्यांना समजावेत त्यांचे सुलभीकरण करण्यात येणार आहे.

एकत्र हे एकच सूत्र आहे : उद्धव ठाकरे

मी अशा आरोपांचा विचार करत नाही. ज्यांना बोंबलायचं आहे त्यांना बोंबलू द्या. सरकार उत्तम चाललं आहे. शरद पवारांबद्दल बोलायचं झालं ते वडीलधारी आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “त्यावेळी त्यांच्या वागणुकीत मस्ती किंवा रुबाब नसतो. एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे येतात, मुद्देसूद बोलतात, थोड्या गप्पा होतात आणि चांगलं सरकार चाललं आहे. सूत्रं वैगेरे असं काही नाही. तिघं एकत्र मिळून काम करत आहोत. एकत्र हे एकच सूत्र आहे”.

आग्रा स्थानकावरून मंदिर हटवलं
तर सामूहिक आत्मदहन करू

आग्रा येथील राजा की मंडी रेल्वे स्थानक परिसरातील मंदिराला रेल्वे प्रशासनानं नुकतीच एक नोटीस बजावली आहे. संबंधित रेल्वे स्थानक परिसरात नवीन लोहमार्ग बांधायचा असल्याने येथील चामुंडा देवीचं मंदिर स्थलांतरित करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून रेल्वेनं ही नोटीस बजावली होती. पण ही नोटीस आल्यानंतर हिंदुत्ववादी गटानं या आदेशाला विरोध केला आहे. संबंधित मंदिर जागेवरून हटवलं तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.

आम्हाला कुणी धमकावले, तर अण्वस्त्रांचा
वापर केला जाईल : किम जोंग उन

आम्हाला कुणी धमकावले, तर अण्वस्त्रांचा वापर केला जाईल’’, असा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दिला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्यासाठी किम यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाची राजधानी पीओंगयांगमध्ये या आठवडय़ात झालेल्या लष्करी संचलनाच्या वेळी किम यांनी आपल्या सेनाधिकाऱ्यांना संबोधित करताना हा इशारा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा
सोमवारपासून तीन देशांचा दौरा

या वर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या प्रवासात २५ कार्यक्रम असतील. सोमवारपासून हा तीन देशांचा दौरा सुरू होईल. सात देशांच्या ८ जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान द्विपक्षीय तसेच बैठका घेतील, तसेच ५० जागतिक उद्योगपतींशीही चर्चा करतील. याशिवाय भारतीय समुदायाच्या हजारो सदस्यांशीही ते संवाद साधतील. युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, मोदी हे २ मेपासून जर्मनी, डेन्मार्क व फ्रान्स या देशांचा दौरा करतील. पंतप्रधान आधी जर्मनीला व नंतर डेन्मार्कला जातील. ४ मे रोजी काही काळासाठी पॅरिसला थांबतील. पॅरिसमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी, तर बलिर्नमध्ये जर्मनीचे फेडरल चान्सलर ओलाफ शूल्झ यांच्यासोबत बोलणी करतील, असे सूत्रांना सांगितले

पारा 40 अंशांच्याही पुढे,
कारच्या बोनेटवर भाकरी भाजल्या

उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागात सध्या कडक ऊन पडत आहे. काही ठिकाणी पारा 40 अंशांच्याही पुढे गेला आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ओरिसामध्ये देखील कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला उन्हात उभ्या कारच्या बोनेटवर भाकरी भाजताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा ही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. महिला गाडीच्या बोनेटवर भाकरी भाजत आहे.

आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागेमध्ये गांजाची लागवड, तब्बल 142 झाडे जप्त, अकोल्यातील धक्कादायक घटना

चक्क आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागेमध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला. हा प्रकार अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयातून समोर आला आहे. हा कारनामा महाविद्यालयाच्या रखवाल्यानेच (सुरक्षा रक्षक) केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकाने परिसरातील बागेमध्ये तब्बल 142 गांजाच्या झाडांची लागवड केली होती. आता पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करुन सर्व झाड तोडून जप्त केली आहेत. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्याचं प्रकाश सुखदेव सौंधले असं नाव आहे.

राज्यातल्या मास्क सक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं वक्तव्य

राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं चिंता वाढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोनानं पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. कोरोनाची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारनं निर्बंध मागे घेतले. मात्र निर्बंध मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या राज्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
देशात सध्या पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकही घेतली होती. तसंच संबंधित राज्यांना काळजी घेण्यासही सांगितलं. यावरही राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.