केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागली आहे. दिशा सालियन प्रकरणी राणे पितापुत्रांनी आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे दिशाच्या कुटुंबीयांनी राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. राणे-पिता पुत्रांना या प्रकरणात पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
फडणवीस यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, राणेंबाबतचा सवाल विचारताच फडणवीस यांनी काहीही भाष्य न करता निघून गेले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळी तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन भाजपला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. रशिया-युक्रेन युद्धापासून ते नवाब मलिक अटक प्रकरण आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर या दोन्ही नेत्यांनी उत्तरे देताना भाजपला धारेवर धरले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना पवार आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलं. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. पण राणे पितापुत्रांना पोलीस ठाण्यात जावं लागल्याचं विचारताच फडणवीसांनी काढता पाय घेतला. पत्रकार राणे राणे ओरडत होते, पण फडणवीसांनी मागे वळून पाहिले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राऊतांच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणात या सगळ्याने माझं मनोरंजन होतंय. या आरोपात काही तथ्य नाही. राऊतांचे आरोप बिनबुडाच्या असल्याचे भाजप नेते सांगता आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. नुकताच त्यांच्या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या सत्तेसाठीच्या स्पर्धेची किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट येताना दिसंय.
संजय राऊत यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांवरच अप्रत्यक्ष निशाना साधला होता. ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला होता.