राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी मोठं विधान केलं आहे. “ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तेव्हा वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करत राहतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
“रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
“आज तरी निर्बंध कडक करण्याच्याच सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या बेड्सची संख्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा कमी असते तेव्हा लॉकडाउनचा पर्याय नाही तर शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा लागतो. त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. सगळ्याच गोष्टींचा आपण विचार करत असतो. आपण कुठे कमी आहोत असा भाग नाही, पण जर आयसीयू आणि ऑक्सिजनच्या बेड्सचा परिणाम जाणवला तर लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागतो. पण त्याचा अभ्यास करावा लागत असून आमचा विभाग आणि मुख्यमंत्री याची चाचपणी करत आहोत. अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि जीवही वाचला पाहिजे त्यामुळे मध्यबिंदू गाठावा लागतो आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा लागतो,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.