खाद्यसंस्कृती ही सर्वत्र बहरलेली आहे. तिचे वेगळे रंग आहेत, चव आहे, तयार करण्याची आगळी परंपरा आहे. या सगळ्या गोष्टीवर प्रकाश या मालिकेतून आम्ही टाकणार आहोत. मूळचे खानदेशचे असलेले आता ना शिकला स्थयिक झालेले सारंग जाधव ही मालिका लिहिणार आहेत…
भुसावळ खाद्यभ्रमंती 1.
‘सप्ता’ ह्या नावावरुन इतरांना काहीही कळणार नाही, पण हाडाच्या भुसावळकराला मात्र लगेच कळेल.कारण त्याचा संबंध थेट पोटाशी किंवा जिभेशी असतो..तर सप्ता म्हणजे भागवत सप्ताह.गल्लीतल्या एखाद्या मंडळातर्फे आठवडाभर भगवदगीतेच्या पारायणाचे आयोजन केले जायच एक महाराज ते पारायण करायचे, मांडवात बोटावर मोजण्याइतकी डोकी असायची त्यात गल्लीतल्या आज्ज्या, मावश्या, रिटायर्ड काका वगैरे असायचे. महाराज बिचारे घसाफोड करत असायचे. पण तरुण मंडळी मात्र सप्त्याच्या समाप्तीच्या दिवसाच्या तयारीत दंग असायची. कारण मुख्य आकर्षण प्रसाद असायच.
वर्गणी गोळा करणे, अन्नधान्याची खरेदि यात हि मंडळी गुंतलेली असायची. मग यायची ती समाप्तीच्या दिवसाच्या आधीची रात्र, जे आठवडाभर चमकत नव्हते असे चेहेरे त्या रात्री चमकायचे.मग कामाचे रितसर वाटप व्हायचे , घरोघरी गव्हाचे पीठ पोहोचवले जायचे त्याच्या मोठाल्या पोळ्या तयार करण्यासाठी.
एकिकडे वांग्याची भाजी रटरटत असायची, हिरव्या मिरचीची हि भाजी म्हणजे जीव कि प्राण. दुसरीकडे वरण, शिजवुन ते घोटायचा कार्यक्रम सुरू असायचा. ते साधसुध काम नसायच, ड्रिलींग मशिनला एक लांबलचक लाकडी रवी जोडलेली असायची. त्या रवीनेच भाजी व वरण घोटायचे असत. .भरपूर हिरव्या मिरच्या लसुण घातलेली भाजी म्हणजे ताटात उतरलेला स्वर्गच ! हे माहीतगाराचच काम असायच. क्वचितप्रसंगी भातदेखील असायचा. ह्या सगळ्या गडबडीत पहाट कधी व्हायची कळायच नाही. मग सप्ताह समाप्तीचा दिवस उगवायचा, आरती वगैरे धार्मिक अनुष्ठान झाल्यानंतर पंगतींना सुरूवात व्हायची.
वांग्याच्या भाजीचा सुवास घराघरात पोहोचायचा मग बच्चे कंपनीला पंगतीचा अदमास घ्यायला पिटाळले जायचे. मग निरोप यायचे..बारे पह्यले मानसांच्या पंगती बसल्या त्या उठल्या कि मंग बायकांच्या बसतीन, अजुन गह्यरा टाईम लागीन अस मोतीदादानं सांगीतल ! अश्या गोड भाषेत निरोपांची देवाणघेवाण व्हायची. पंगतीला यायच म्हणजे एक सोहळा असायचा स्वत:चा लोटा किंवा तांब्या असणे हि मुख्य अट व जोडीला लिंबाची फोड. रस्त्यावरच मांडव घातलेला तिथेच पंगतीला सुरूवात व्हायची, कुणीही न सांगता माणस पटापटा शिस्तीत रांगेत बसायची.
केळीची पान वाढायला सुरूवात व्हायची एखाद्याला फाटक पान आल कि तो ओरडायचा ओ भ्भौ भाजी कुढी वाढशीन ,येक पान दे अजुन ! पोळ्यांची चळत घेवुन त्या चुरायला सुरूवात व्हायची ते झाल कि त्यामधोमध एक गोलाकार केला जायचा. त्यात वरण ओतल जायच, वरण आल कि तूप यायच..मग तूपावाल्याशी सलगी दाखवत ओत न रे भ्भौ थोड अजुन वगैरे संवाद घडायचे.. मग तो काला (त्याला काला असच म्हणायच ) व वांग्याची भाजी यावर लिंबू पिळुन ते झकास जमलेल मिश्रण, याचा आस्वाद घ्यायचा. मधुनच आरोळ्या यायच्या..ओ भिकाभाऊ..भाजी खुटली का..वाढा न मंग..पोया घ्या..नुस्ता धुमाकुळ ..झणझणीत हिरव्या मिरच्यांची वांग्याची भाजी व वरणाच्या पोळ्यांचा काला हे भन्नाट काँम्बीनेशन ज्यांनी चाखलय तो त्यावरुन पंचकारांकित हाँचेलमधले देवण ओवाळुन टाकेल. बर जिथे हा स्वयंपाक सुरू असायचा तिथे वेगळाच ड्रामा..,
वाढप्याजवळ दोनचार डोकी रिकामे डबे घेवुन उभी असायची, त्यांची भुणभुण..”यात थोडी भाजी भरजा बर, मोतीभाऊन सांगेल हे” वगैर् दमबाजी..यावर वाढपीच ठरलेल उत्तर असायच, येवढी पंगत उठू दे मंग देतो तुह्या डबा भरुन.. अशी सगळी गंमत. अश्या पंगतींचा मात्र एक अलिखीत नियम असायचा, पंगत ओटोपली की जो तो आपआपली पानं उचलायचा व मांडवाच्या मागे असलेल्या ट्रँक्टरच्या ट्राँलीत टाकुन यायचा.
काही वेळात ती भाजी, पोळ्या, वरण यांची अद्भूत चव जिभेवर अशी काही रेंगाळायची की पेंग यायला सुरूवात.. मग जे काही हाडाचे कार्यकर्ते असतील तेच मांडवात उरायचे. तेच बिचारे नंतरची सर्व आवराआवर करायचे.. बाकीचेे चमको कार्यकर्ते दुपारच्या गाढ झोपेत असायचे.. असे सप्ताह अजुनही होत असतील पण ती मजा काही औरच होती. लिखाण थोड लांबलय खर पण त्याला इलाज नाही. हा पहिलावहिला भाग जसा जमेल तसा लिहीलाय.. सप्त्याच्या प्रसादाप्रमाणे गोड मानून घ्या.. आवडला नाही तस तसेही सांगा म्हणजे इथच थांबेन..
सारंग जाधव 9822936123