नायगाव येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांना अचानक घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कडाडून विरोध केला आहे. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलिस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने नायगाव पोलिस वसाहतीला भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. दरेकरांनी पोलिस बांधावांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकून घेतले व त्यांना धीर दिले. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.
पोलिसांना घर सोडण्यास सांगितले जात आहे, पण त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. कोविड काळ असो की सण… कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करून जनतेचे संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असे होऊ देणार नाही. प्रसंगी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करू. राज्य सरकार पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी लागणा-या आवश्यक निधीपासून पळ काढत असेल तर गरज पडल्यास येथील राहिवाशांसाठी विधानसभेतील आमदार मिळून एकत्रित निधी दुरुस्तीसाठी देऊ. परंतु पोलिस बांधवांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
आयपीएस अधिकाऱ्यांसाठी या जागेत मोठे टॉवर बांधायचे आहेत. त्यामुळे सरकारला आयपीएस अधिकाऱ्यांची काळजी आहे. मात्र दिवस-रात्र परिश्रम करणाऱ्या पोलिसांची काळजी सरकारला नाही. राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे या प्रकरणावरुन दिसून येत आहे. या कारवाईमागे काही कट असेल तर तो आम्ही सफल होऊ देणार नाही. मोठे पगार घेणारे आयपीएस अधिकारी आपल्या राहण्याची सोय करू शकतात, परंतु अल्प वेतन असणारे पोलिस बांधव मात्र आपल्या वेतनामधून साधे झोपडेसुद्धा घेऊ शकत नाही. याचा विचार नोटिस बजावताना सरकारने करायला हवा होता, अशी टीकाही त्यांनी केली. (फोटो क्रेडिट गुगल)