पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर केला आहे. महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी द्यावे असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.
पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे. महापालिका हद्दीपासून सुमारे 40 किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील तीन दिवसात खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमधील पाणीसाठ्यात 11.5 टीएमसी इतकी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 20.21 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्यावर्षी 24 जुलैला तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. मात्र, यंदा धरणात अधिक पाणीसाठा आहे.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात 4.2 टीएमसीची वाढ झाली होती. कुकडी प्रकल्प अंतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे. (फोटो क्रेडिट गुगल)