पंजाबची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. या कारवाईत ईडीने भूपेंदर सिंह हनी आणि भूपेंदर यांच्या जवळचे संदीप कपूर यांच्या घरून अनुक्रमे 6 आणि 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत ईडीने संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जप्त केले आहेत.
पंजाबमध्ये 20 फ्रेब्रुवारी रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय वातावरण तापलेले आहे. असे असताना काँग्रेसचे (Congress) नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारल्याने आश्चर्य व्यत्त केले जात आहे.
ईडीने केलेल्या या कारवाईची देशभरात चर्चा होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या होता. अशाच प्रकारे काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा दबावातंत्राचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया चन्नी यांनी दिलीय. तर ईडीकून धाड टाकणे हे भाजपचे सर्वात आवडते शस्त्र आहे. भाजप अनेक गोष्टींना लपवू पाहत आहे. आम्हाला कशाचीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिलीय.
मागील काही दिवसांपासून ईडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. अवैध पद्धतीने रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना ईडीने लक्ष्य केलं आहे. मंगळवारी ईडीने अनेक लोकांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये चन्नी यांच्या नातेवाईकांचादेखील समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चंदीगड, मोहाली, पाठणकोट, लुधियाना अशा महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. या कारवाईत ईडीसोबत सीआरपीएफचे जवानदेखील होते. 2018 साली नवाशहर पोलिसात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल पोलिसांनी घेतलेली आहे.