तिरुपतीला भीषण पूर आल्याने व्यंकटेश्वराच्या दर्शनाला गेलेले शेकडो यात्रेकरू अडकून पडले आहेत. पुरामुळे यात्रेकरूंना बाहेर जाता येत नसल्याने देवाचे दर्शन बंद करण्यात आले. मुसळधार पावसामुळे तिरुमला येथील जपाली अंजनेय स्वामी मंदिर पुर्ण पाण्याखाली बुडाल्याचे दृश्य बघायला मिळाले. तिरुमला टेकडीवरील मुख्य मंदिराला लागून असलेल्या चार माडा रस्त्यावर ही पाणी तुंबले आहे. याशिवाय, पूर आणि भूस्खलनामुळे तिरुमला हिल्सकडे जाणारे घाटातील दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्यांनी पवित्र टेकड्यांवर अडकलेल्या यात्रेकरूंसाठी मोफत भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील दबावामुळे तिरुपती शहरात आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं, हवामान खात्याने सांगितलं.
नारायणगिरी अतिथीगृह संकुलात भूस्खलनामुळे तीन खोल्यांचे नुकसान झाले, परंतु खोल्यांमधले लोकं आधीच बाहेर आल्याने, जिवीतहानी टळली. नारायणगिरीमध्ल्या इतर खोल्यांमध्ये राहणाऱ्या यात्रेकरूंना आणि जवळच्या एसव्ही गेस्ट हाऊसमधील यात्रेकरूंना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक यात्रेकरूंनी आणि रहिवाशांनी त्रिपुतीमधील पुरस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तीथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती सुधारूपर्यंत तिरुपतीला जाणे टाळावे, असे आवाहन केले जात आहे.
तिरुपती पुरामुळे विमान आणि रेल्वेसेवांना फटका
रेनिगुंटा येथील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले होते, त्यामुळे अधिकाऱ्यांना येणाऱ्या विमानांचे लँडिंग थांबवणे भाग पडले. हैदराबाद आणि बेंगळुरू येथून तिरुपती येथे उतरण्यासाठी नियोजित केलेल्या दोन प्रवासी विमानं माघारी पाठवली गेली. मुसळधार पावसामुळे टाडा आणि सुल्लुरपेट दरम्यानच्या पुलाजवळ पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण रेल्वेने गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहात.