मलेशियाचे पंतप्रधान मुहियुद्दीन यासिन यांनी आपले सरकार अल्पमतात आले असल्याचे मान्य करून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळीच राजे अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यासिन यांनी 18 महिन्यांपूर्वीच मलेशियाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. आता रिकाम्या झालेल्या पंतप्रधानपदासाठी मलेशियातील राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये उपपंतप्रधान इस्माईल साबरी हे आघाडीवर आहेत.
मलेशियामध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय पोलीस प्रमुख, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि ऍटर्नी जनरलनी राजांची भेट घेऊन आगामी कृतीबाबत चर्चा केली असल्याचे समजते आहे.
मोहियुद्दीन यासिन यांना प्रथमपासूनच मलेशियाच्या संसदेमध्ये बहुमत टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागले होते. त्यांच्या आघाडी सरकारमधील डझनभर खासदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे संसदेतील त्यांचे बहुमत संपुष्टात आले होते.
आपल्या सरकारला बहुमत असल्याचे ते पूर्व म्हणाले होते. मात्र, मंतर त्यांनी सरकार अल्पमतात आल्याचे मान्य केले. मलेशियातील करोनास्थिती बिघडण्यासाठी यासिन यांची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याची टीक होऊ लागली होती.